सहा वर्षात सव्वालाख बलात्कार

निवडणुकीचे निकाल लागणे सुुरु झाल्यावर ज्या प्रमाणे निकालांचा पाऊस पडतो त्याप्रमाणे बलात्काराच्या बातम्यांचा सध्या काळा पाऊस सुरु आहे. पुण्यात आणि बारामतीतही याच बातम्या पुढे आल्या आहेत. अल्पवयीन मुली, मतिमंद मुली, असहाय्य महिला आणि अगदी सातार्‍यासारख्या शहरातील शासनसंचालित आश्रमशाळेतील स्वयंपाकी महिलांनाही सुरक्षिततेची शाश्वती राहिलेली नाही. काल पुण्यातील एका गतिमंद मुलीवर अनाथालयात अत्याचार झाले. यातील आश्चर्याची बाब अशी की, त्या आरोपीला पाठीशी घालण्यासाठी स्थानिक डॉक्टरांनी आरोपीकडे पाच लाख रुपयांची मागणी केली आणि आरोपीच्या आईवडिलंानीच पोलिसाकडे तक्रार करून त्या असहाय्य महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी मदत केली.

पुण्यातील या अत्याचाराची माहिती पुढे येईपर्यंत बारामतीयेथे अशीच एक घटना झाल्याचे वृत्त आहे. एखाद्या ठिकाणी आज घटना घडलेल्या नाहीत तेथे शांतता आहे असे मानू नये कारण तेथे कालच अशा घडल्या आहेत आणि कदाचित उद्याही घडण्याची शक्यता आहे. संसदेने बलात्काराच्या आरोपीला फाशीची शिक्षा देणारा कायदा संमत केल्यावर वास्तविक हे कोठे तरी थांबायला हवे पण प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात अशा घटना घडत आहेत. गेल्या सहा वर्षात देशात अशा अत्याचाराच्या सव्वा लाख घटना पोलीस दप्तरी नोंदल्या गेल्या आहेत न नोंदल्या गेलेल्या घटनांचा वाली परमेश्वरच आहे. याचे एकमेव कारण ‘आग रामेश्वरी आहे आणि सारे बंब सोमेश्वरी जात आहेत. आग एकीकडे आणि बंब दुसरीकडे ही स्थिती केवळ भारतात नाही तर जगभर तीच स्थिती आहे आणि भारतातील प्रकाराला लाजवतील अशी घटना जगभर घडत आहेत. आणि जी काळजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग व विरोधीपक्षनेत्या सुषमा स्वराज व्यक्त करीत आहेत तीच स्थिती रशियाचे पुतीन आणि ब्रिटनचे कॅमेरॉन व्यक्त करीत आहेत. जोपर्यंत इंटरनेटवरील स्वैराचार दररोज नवे नवे रूप घेऊन येत आहे तोपर्यंत देशोदेशींच्या संसदांनी अशा आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचे कायदे करून ते अंमलात आणण्यास सुरुवात केली तरी असे प्रकार कमी होणार नाहीत ते वाढतच राहतील.दिल्लीत अत्याचार केलेल्या आरोपींना बिहारमध्ये अटक झाल्यावर त्यांनी स्वैराचाराच्या चित्रफितीचेच कारण सांगितले आहे. याच संदर्भात दिल्लीमध्ये निघालेल्या एका मोर्चात मुलींनी असा फलक हातात घेतला होता की, देशात आणि जगात मुलींची संख्या कमी का होत आहे यावर दारुण परिस्थितीवर प्रकाश पडावा.

आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी ही स्थिती समजून घेण्याची मानसिकता अजून नाही तर जगातील कुटुंबव्यवस्था अणि समाजव्यवस्था कोलमडून पडावी म्हणून जगातील काही दहशतवादी संघटना अतिशय घृणास्पद मार्गाने कार्यरत असल्याची परिस्थिती मान्य करणे अजून फार लांबची स्थिती झाली. युरोपातील चर्चसंघटनांनी हा प्रकार प्रथम जगात सुरु केला आणि आता तो प्रकार जाहिरातीद्वारे प्रचंड पैसे कमावण्याचा मार्ग झाला आहे. या विषयावर देशोदेशीच्या संसदातून आणि सर्वोच्च न्यायालयातून हे विषय ऐरणीवर येत आहेत पण अचूक ठिकाणी घण बसण्याच्या आधीच तो विषय ऐरणीवरून घरंगळत आहे. गेल्या महिन्यात युरोपीय पार्लमेंटच्या डेन्मार्कमधील एक खासदार कार्तिका मारा लिओनार्द यांनी हा विषय लावून धरला. पण ज्या दिवशी त्यावर चर्चा होणार होती त्या दिवशी युरोपमधील सरकारे समलिंगी विवाहाच्या मागणीच्या संघटनांनी आंदोलनाचा जोर वाढविल्यामुळे काही युरोपीय सरकारे पडण्याची स्थिती निर्माण झाली आणि हा विषय मागे पडला.

युरोपमधील कोणतेही दैनिक इंटरनेटवर वाचायला घेतले तर या स्वैराचाराचे आरोपी लक्षात येवू लागतात. काही चर्च संघटनांनी त्याला सुरुवात केली व आता तो अब्जावधी डॉलर्सचा जाहिरातीसाठी पूरक व्यवसाय झाला आहे. सध्या चीनने या विषयाला सीमेबाहेर रोखले आहे पण अन्यत्र यातून निर्माण होणार्‍या समस्या महाभयानक स्वरुप धारण करत आहेत. निराळ्या अर्थाने ही दहशतवादी किंवा अतिरेकी कृतीच म्हणायला हवी. अर्थातच सध्या भारतापासून ते अमेरिकेपर्यंत ज्यांना दहशतवादी किंवा अतिरेकी म्हणले जाते ते हे नव्हेत. युरोपमधील स्वैचाचारी अतिरेकी आणि मध्यपूर्व देशातील अतिरेकी यातील महत्वाचा फरक असा की, हे मध्यपूर्वेतील अतिरेकी युरोपीय स्वैराचार्‍याविरोधात सर्व शक्तिनिशी उभे राहण्यास तयार असतात आणि युरोपीय अतिरेकी सर्वशक्तिनिशी जेहादी अतिरेक्याविरोधात उभे राहण्यास तयार असतात.

हा विषयच येवढा दहशतवादी आहे की, सामान्य माणसाला तो हाताळताही येणे कठीण आहे. त्यावर चर्चा करणेही अधिक त्रासदायक होणे शक्य आहे. पण समाजातील धुरिणांनी यावर विचार करण्याची वेळ आली आहे. सध्या प्रसारमाध्यमाकडे न जाता यावर काही विचार करणारे व मार्ग सुचविणारे गट निर्माण होण्याची गरज आहे. फाशीच्या शिक्षेची तरतूद करूनही एखाद्या गुन्ह्यात वाढ होणार असेल तर यावर अजून खोलवर जावून मार्ग काढायला हवा.