बंगळुरू, दि.२२ – भल्याभल्यांना ‘कोडयात’ घालणारी ‘कोडी’ चुटकीसरशी सोडविणार्याम आणि जगातील सर्वात वेगवान ‘मानवी संगणक’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या गणिती शकुंतला देवी यांचे बंगळूरू येथील रुग्णालयात निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. दोन आठवड्यांपूर्वी श्व्सनासंबधीच्या गंभीर तक्रारींमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हृदय तसेच किडनीच्या कार्यातही अडथळा निर्माण झाला होता. कुठलेही औपचारिक शिक्षण न झालेल्या शकुंतला देवी गणितातील तेरा अंकी संख्येचा गुणाकार केवळ २८ सेकंदात करत असत. ४ नोव्हेंबर १९३९मध्ये जन्मलेल्या देवी यांनी असामान्य गणिती बुद्धिमत्तेमुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही स्थान पटकावले होते. ‘फन विथ नंबर्स’, ‘अॅास्ट्रॉलॉजी फॉर यू’, ‘पझल्स टू पझल यू’ ही त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत.
