व्यापार्‍यांचा दोन दिवसांचा बंद सुरू

पुणे दि.२२ – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत घोषणा केल्या प्रमाणे ऑक्ट्राय ऐवजी एलबीटी लागू केला आहे असा जीआर सरकारने काढावा यासाठी तीन लाखांहून अधिक व्यापारी दोन दिवसांच्या बंद मध्ये सामील झाले असल्याचे समजते. आज सकाळपासून हा बंद सुरू झाला. सरकारने जीआर काढला नाही तर ८ मे पासून व्यापार्‍यांनी बेमुदत बंद पाळण्याची धमकी दिली आहे. आज आणि उद्याच्या दोन दिवसांच्या बंद मधून औषधे, भाजीपाला, दूध आणि पेट्रोल यांना वगळण्यात आले आहे.

याविषयी अधिक माहिती देताना पुणे चेंबर ऑफ मर्चंटसचे अध्यक्ष अजित सेठीया म्हणाले की सरकारने जीआर जारी करावा ही आमची मागणी आहेच पण त्याचबरोबर व्हॅट आणि एलबीटी यांचे विलीनीकरण करावे अशीही आमची मागणी आहे. दोन दिवसांचा आत्ताचा बंद आमच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठीच पुकारला गेला आहे.

नवीन करानुसार जे व्यापारी किमान पाच हजारांचा माल आयात करतात त्या सर्वांनी संबंधित महापालिकांकडे नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया गेल्या रविवारपासून सुरूही करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी बंद सुरू होण्यापूर्वी व्यापारी प्रतिनिधींची बैठक घेऊन बंदसंबंधी पुनर्विचार करावा अशी सूचना केली होती मात्र ती व्यापारी संघटनांनी मानलेली नाही.

Leave a Comment