अजित पवार यांच्यावर ‘कॅग’ चे ताशेरे

मुंबई – गेल्या काही दिवसापासून वादात सापडलेले उपमुख्यमंत्री अजित पवार व विद्यमान जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यावर ‘ कॅग ‘ ने त्यांच्या ताज्या अहवालात प्रकल्प रखडल्याचा व खर्चात वारेमाप वाढ झाल्याचा ठपका ठेवला आहे . सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या खात्यावरही ‘ कॅग ‘ चे ताशेरे आहेत .विधिमंडळाच्या उभय सभागृहात ‘ कॅग ‘ चा अहवाल सादर झाला आहे. या अहवालामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

राज्यातील जलसंपदा विभागाचे ४२६ प्रकल्प रखडले असून त्याचा खर्च २६ हजार ६१७ कोटी रुपयांनी वाढला आहे . या प्रकल्पांची प्राथमिक अर्थसंकल्पीय किंमत १२ हजार ६६२ कोटी रुपये होती , ती वाढून ४३ हजार २७० कोटी रुपये झाली आहे , असे ‘ कॅग ‘ ने म्हटले आहे . यामध्ये ‘ कॅग ‘ ने पाच पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत अपूर्ण प्रकल्पांसाठी ४० वर्षांचा अवधी लागला असून या ४२६पैकी २४२ अपूर्ण प्रकल्पांबाबत प्राथमिक अर्थसंकल्पीय मूल्य ७ हजार २१५ कोटींपासून वाढून ३३ हजार ८३२ कोटी रुपये झाले . परिणामी एकूण मूल्य २६ हजार ६१७ कोटींनी वाढले .

गेल्या काही दिवसांपासून विविध वादांमुळे चर्चेत असलेल्या सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या खात्यावरही ‘ कॅग ‘ चे ताशेरे आहेत . या विभागाचे १८८ प्रकल्प अपूर्ण असून यापैकी ६२ इमारती व घरांचे प्रकल्प चारहून अधिक वर्षे रखडले असल्याचे अवहालात म्हटले आहे.