राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाने दोन बालिकांना गाडीखाली चिरडले – एकीचा मृत्यू

औरंगाबाद दि.१७ – तुफान वेगात असणार्याड एका एसयूव्ही गाडीने दोन बालिका आणि त्यांच्या काकाला चिरडल्याची घटना औरंगाबाद येथे घडली असून गाडी चालविणारा बिलाल हा राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष अब्दुल कादीर मौलाना यांचा मुलगा असल्याचे समजते. बिलाल १७ वर्षांचाच असून त्याचा ड्रायव्हर त्याच्याशेजारी गाडीत होता.

मंगळवारी सकाळी ही गाडी भरधाव वेगाने विमानतळाच्या दिशेने जात असताना रस्ता ओलांडणार्‍यां दोन लहान मुलींसह त्यांच्या काकाला या गाडीने चिरडले. त्यात नव्या प्रकाश सोनावणे या मुलीचा मृत्यू झाला तर तिची दोन वर्षांची बहीण गंभीर जखमी झाली. नागरिकांनी ताबडतोब गाडी थांबवून बिलाल याला पोलिसांच्या ताब्यात दिले आणि संतप्त नागरिकांनी ही गाडी पेटवून दिली. मुलींना चिरडताना या चौकात नुकत्याच बसविण्यात आलेल्या सीसी कॅमेर्‍यांत ही घटना नोंदली गेली. ते फूटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या अपघाताचा तपास पो.निरीक्षक प्रताप बावीस्कर हे करत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दोन छोट्या मुली काकासोबत मंदिरात जात होत्या तेव्हा या गाडीने त्यांना चिरडले. बिलाल आणि त्याचा चालक यांना आज न्यायालयासमोर हजर केले जात आहे.