अजित पवारांचे बारामती तालुक्यातील विकास कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश


पुणे – बारामती तालुक्यात सुरू असलेली विविध विकासकामे गतीने पूर्ण करा, तसेच विकासकामे दर्जेदार पद्धतीने करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या. बारामती तालुक्यातील विविध विकासकामांबाबतची आढावा बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडली.

या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांकडून बारामती शहरातील तसेच तालुक्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांची माहिती घेतली. विकासकामे दर्जेदार करावित, कामे वेळेत करावित, कोणत्याही अधिकाऱ्यांनी कामात दुर्लक्ष करू नये, आवश्यक त्या ठिकाणी वन विभागाची परवानगी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सायंबाचीवाडी येथील सुशोभित केलेल्या पाझर तलावास भेट दिली. सुशोभित केलेल्या पाझर तलावाचे काम पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाधान व्यक्त केले. पाझर तलावाच्या सभोवती ओपन जीम आणि प्ले ग्राऊंड तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर पदाधिकारी आणि विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर काऱ्हाटी येथील कृषि उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या ‘आयटीआय’ इमारतीच्या कामाची पाहणी त्यांनी केली.

सुपे येथील नियोजित मार्केट, पोलीस स्टेशनच्या जागेची पाहणी करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित पदाधिकारी आणि अधिकारी यांना सूचना दिल्या, त्यानंतर ग्रामीण रुग्णालय व विद्या प्रतिष्ठानच्या शाळेच्या इमारतीच्या सुरु असलेल्या कामांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तत्पूर्वी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथे आयोजित जनता दरबारात नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याबाबत आवश्यक ते निर्देश दिले.