मुशर्रफ यांची उमेदवारी अडचणीत

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी चार मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केले होते परंतु त्यापैकी तीन मतदार संघांतील त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. यापैकी एका मतदार संघातून त्यांची उमेद्वारी नाकारण्यात आल्याच्या प्रकरणात त्यांनी
निवडणूक लवादाकडे अर्ज केला होता परंतु निवडणूक लवादानेही त्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्यासच त्यांना अडचण येऊ शकते अशी स्थिती निर्माण झाली आहे.

कराचीतील मतदार संघातून त्यांनी दाखल केलेला अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी फेटाळला आहे. त्या मतदार संघातून अर्ज दाखल केलेल्या एका उमेद्वाराने त्यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. सन २००७ च्या आणीबाणीच्या काळात मुशर्रफ यांनी देशाच्या घटनेचा भंग केला आणि त्यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनाही त्यांनी बरखास्त करून घटनाबाह्य कृती केली होती त्यामुले त्यांना निवडणूक लढवण्यास मज्जावकरावा असा आक्षेप विरोधी उमेदवाराने घेतला होता. तो ग्राह्य मानण्यात आला असून त्यानुसार त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला आहे.

या निर्णयावर मुशर्रफयांनी निवडणूक लवादाकडे आव्हान याचिका दाखल केली होती परंतु ती याचिकाहीफेटाळण्यात आली आहे. मुशर्रफ यांनी एकूण चार मतदार संघातून निवडणूक अर्ज दाखल केले होते तथापि कराची, कसौर आणि इस्लामाबाद या मतदार संघातील त्यांचे अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. मात्र चित्रल मतदार संघातील त्यांचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात आला असला तरी अनेक वकिलांनी त्या उमेदवारीलाही आव्हान दिले आहे.