सरकारी हस्तक्षेपाचा आरोप बिनबुडाचा – खुर्शिद

फारूखाबाद: कोळसा खाण वाटप घोटाळ्याच्या प्रकरणातील सीबीआयच्या अहवालात पतंप्रधानांचे कार्यालय आणि कायदा मंत्रालयाने हस्तक्षेप केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे परंतु तो आरोप बिनबुडाचा आहे असा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री सलमान खुर्शिद यांनी केला आहे.

काल रात्री येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. ते म्हणाले की, सीबीआयचे कार्यालय पंतप्रधानांच्या अख्त्यारीत येते. परंतु त्यांनी यात कोणताही हस्तक्षेप केल्याच्या आरोपात जराही तथ्य नाही. सीबीआयकडून माहिती मागवणे आणि त्यांच्या कामात हस्तक्षेप करणे यात फरक आहे. हा फरक विरोधकांनी जाणून घेतला पाहिजे.

कोळसाखाण वाटप घोटाळा प्रकरणात सीबीआयने न्यायालयात सादर करण्यासाठी जो रिपोर्ट तयार केला होता त्यात पंतप्रधान कार्यालय आणि कायदा मंत्र्यांनी हस्तक्षेप करून बदल केल्याचा आरोप भाजपने केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करीत त्यांनी कायदा मंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. तथापि यात सरकारने हस्तक्षेप केलेला नाही असा खुलासा खुद्द सीबीआयनेच केला आहे याकडे खुर्शिद यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.