भाजपबरोबर आघाडी नाही: पटनाईक

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाबरोबर पुन्हा राजकीय आघाडी होण्याची शक्यता ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी फेटाळली आहे. ते म्हणाले की त्यापेक्षा राष्ट्रीय पातळीवर तिसरी आघाडी स्थापन करणे हा एक सशक्त पर्याय ठरू शकतो.

पटनाईक हे दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या परिषदेसाठी आले आहेत. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. भाजप प्रणित एनडीएने आता पुन्हा आपल्या जुन्या मित्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. त्या प्रयत्नात भाजपकडून पुन्हा नवीन पटनाईक यांनाही गळ घातली जाऊ शकते. त्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांनी
त्यांना प्रतिक्रीया विचारली असता त्यांनी वरील प्रमाणे प्रतिक्रीया दिली.

१९९९ ते २००९ या काळापर्यंत पटनाईक यांचा बिजु जनता दल हा पक्ष भाजपप्रणित एनडीए आघाडीत होता. परंतु त्यानंतरच्या काळात या पक्षाने एनडीए बाहेरचा रस्ता धरला. पटनाईक म्हणाले की; भाजपबरोबर आता पुन्हा घरोबा करण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. राष्ट्रीय पातळीवर समविचारी पक्षांची
तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न झाले तर आपण त्याला प्रतिसाद देऊ.

काँग्रेस आणि भाजपप्रणित आघाडीला आता समर्थ पर्याय देण्याची गरज निर्माण झाली आहे असे मतही त्यांनी नमूद केले.