पुणे- पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी हिमायत बेग याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. पुणे सत्र न्यायालयात सोमवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. या स्फोटात १७ जणांचा बळी घेतला होता, तर ४५ नागरिक जखमी झाले होते.
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी बेग दोषी
कोरेगाव पार्क येथिल जर्मन बेकरीत १३ फेब्रुवारी २०१० रोजी सांयकाळी पावणे सातच्या दरम्यान इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेने ‘ आरडीएक्स ‘ चा स्फोट घडवून १७ जणांचा बळी घेतला होता , तर ४५ नागरिकांना जायबंदी केले होते.
याप्रकरणी एटीएसने हिमायत बेगला उदगीर येथून अटक केली होती. त्याच्या घरातून १२०० किलो स्फोटकांचा साठाही जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात एटीएसने एकूण ४० जणांवर आरोप निश्चित केले होते. हिमायत बेग हा त्यातील मुख्य आरोपी होता. न्यायालयाने त्याच्यावर अखेर ठपका ठेवला आहे. अन्य ४० जणांवरील आरोपांची सुनावणीही न्यायालयात सुरू असून त्याचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता आहे.
