गुजरात : रस्त्याच्या कडेला झोपलेल्या १५ मजुरांचा ट्रकखाली चिरुडून मृत्यू


सुरत – मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुजरातमधील सुरतमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. सुरत जिल्ह्यातील कोसांम्बा येथे मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास झालेल्या एका अपघातामध्ये काही मजूर चिरडले गेले असून त्यापैकी अनेकांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार मरण पावलेले सर्वजण हे मजूर आहेत.

अपघाताच्या वृत्ताला दुजोरा देताना, ट्रकने किमान १३ जणांना चिरडल्यामुळे मृत्यू झाला आहे. सुरतमधील कोसांम्बामध्ये ही घटना घडल्याचे स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच मरण पावलेले व्यक्ती या मजूर असून ते सर्वजण मूळचे राजस्थानमधील रहिवाशी असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान या १३ जणांबरोबरच त्यांच्या इतर दोन सहकाऱ्यांचाही नंतर मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या अपघातामध्ये सहाजण जखमी झाले असून जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले आहे. हा अपघात झाला तेव्हा घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार एका ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्याकडेला झोपलेल्या मजुरांच्या अंगावर गेला. पोलिसांनी या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. रात्री या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी आणि मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून मदतकार्य सुरु आहे.

हा अपघात सूरतमधील पलोड गावाच्या जवळ असणाऱ्या किम मांडवी रस्त्यावर झाला आहे. किम हाकर मार्गाजवळ एका ट्रकचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. रात्री बारानंतर झालेल्या या अपघातामध्ये ट्रक एका ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकला. मांडवीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर ट्रॅकवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रकचा चालक आणि क्लिनरही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.