तालिबानच्या हल्ल्यात १३ अफगाण सैनिकांचा मृत्यू

काबूल, दि.१३ – तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमध्ये लष्कराच्या नाक्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 13 अफगाण सैनिक मृत्युमुखी पडले. कुनार प्रांतातील नरी जिल्ह्यात ही घटना घडली. तालिबान्यांनी हल्ल्याचे लक्ष्य केलेला लष्करी नाका पाकिस्तानी सीमेलगत आहे. पहाटेच्या सुमारास तालिबान्यांनी हा हल्ला चढवला. त्याला अफगाण सैनिकांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे सुमारे पाच तास दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. हल्ल्यात बहुतांश अफगाण सैनिक मृत्युमुखी पडल्यानंतर तालिबानी दहशतवाद्यांनी नाक्यावरील शस्त्रास्त्रे आणि दारूगोळ्याचा साठा ताब्यात घेतला. दरम्यान, या हल्ल्यात १५ अफगाण सैनिक मृत्युमुखी पडल्याचा दावा तालिबानकडून करण्यात आला आहे.