रायबरेली, अमेठीच्या व्हीआयपी दर्जाला झटका

लखनौ, दि. 12 – राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या रायबरेली आणि अमेठी या उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांना देण्यात आलेल्या व्हीआयपी दर्जाला मोठा झटका बसला आहे. या जिल्ह्यांना होणारा अखंडित वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. तिथे आता विजेचे भारनियमन केले जाणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि या पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे मायलेक अनुक्रमे रायबरेली आणि अमेठी मतदारसंघांमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत.

उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठीसह नऊ जिल्ह्यांमध्ये अखंडित म्हणजे २४ तास वीजपुरवठा करण्यात येत होता. अखंडित वीजपुरवठा करण्याचा निर्णय नऊ महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. हा निर्णय घेऊन ठराविक जिल्ह्यांनाच अखंडित वीज पुरवण्यामागचे नेमके कारण देण्याची सूचना वीज नियामक प्राधिकरणाने केली होती. त्यामुळे उत्तर प्रदेशात सत्तारूढ असलेल्या समाजवादी पक्षाच्या (सप) सरकारची गोची झाली होती. या पार्श्वतभूमीवर, राज्याच्या वीज मंडळाने रायबरेली आणि अमेठीला दिलेला व्हीआयपी दर्जा काढून घेण्याचा निर्णय गुरुवारी रात्री घेतला. त्यापाठोपाठ या भागांमधील वीज चार तासांहून अधिक काळ गायब झाली.

उत्तर प्रदेशच्या इतर भागांमध्ये वीजटंचाई जाणवत असल्याचे कारण पुढे करून वीज मंडळाने रायबरेली आणि अमेठीबाबतचा निर्णय घेतला. मात्र, काँग्रेसला या निर्णयामागे राजकारण असल्याचा संशय येत आहे. त्यातूनच काँग्रेसने मैनपुरी, कनौज, इटावा यांसारख्या काही भागांत अखंडित वीजपुरवठा सुरूच असल्याकडे लक्ष वेधले आहे. मैनपुरी हा सपचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांचा तर कनौज हा मुलायम यांच्या सुनेचा लोकसभा मतदारसंघ आहे. यादव कुटुंब मूळचे इटावा जिल्ह्यातील आहे. ही बाब ध्यानात घेता रायबरेली आणि अमेठीमध्ये वीज भारनियमन सुरू होण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

Leave a Comment