मुंबई- विजेची बचत करण्यासाठी चारकोपमध्ये लवकरच सुरू होणा-या म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेत सोलार लाइटची सुविधा असेल. सध्या सौर ऊर्जेचा वापर घराबाहेरील उपकरणांसाठी करण्यात येणार असला तरी पुढे हा प्रयोग व्यापक प्रमाणात अपेक्षित आहे . नव्या प्रयोगामुळे विजेची बचत होणार असली तरी घरांच्या किमती मात्र थोड्याफार वाढणे अपेक्षित आहे .
म्हाडामध्ये सोलार लाइटची सुविधा
सर्वसामान्यांना परवडणाऱ्य दरात घरे उपलब्ध करून देणाऱ्या म्हाडाच्या नव्या वसाहती आता सौर ऊर्जेने लखलखणार आहेत . म्हाडाच्या वसाहतीत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे प्लॅण्ट उभारण्याचा उपक्रमही सुरू झाला आहे . यानंतर पुढचे पाऊल म्हणून म्हाडाच्या वसाहतीत सौर ऊर्जेचे युनिट सुरू करण्याचे काम येत्या काही महिन्यात सुरू होणार आहे . स्ट्रीट लाइट आणि जिन्यांमधील दिव्यांसाठी मोठ्या प्रमाणात लागणारी वीज सोलार पॅनलचा वापर करून वसाहतींमध्येच तयार करण्याची म्हाडाची योजना आहे . चारकोपमध्ये ११२ सदनिकांच्या म्हाडा वसाहतीचे काम येत्या काही महिन्यात हाती घेतले जाणार आहे .
याच वसाहतीपासून सौर ऊर्जेच्या वापराचा शुभारंभ होणार आहे . यानंतर म्हाडाच्या प्रत्येक वसाहतीत हा प्रयोग राबवण्यात येईल . इमारतीच्या गच्चीवर सौर ऊर्जेचे पॅनल बसवण्यात येईल . सुरुवातीला सौर ऊर्जेचा वापर फक्त स्ट्रीट लाइट आणि जिन्यातल्या दिव्यांपर्यंत मर्यादित असला तरी भविष्यात पाणी तापवण्यासाठी , जेवण तयार करण्यासाठी याचा उपयोग करण्याबाबत विचार होऊ शकतो , अशी माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे . म्हाडाने याबाबत धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे . अपारंपरिक ऊर्जेच्या विषयाच्या समन्वयाची जबाबदारी असलेल्या महाऊर्जा या सरकारी संस्थेशी म्हाडाने याबाबत संपर्क साधला आहे . सौर ऊर्जा मिळवण्यासाठी सुरुवातीला करावी लागणारी गुंतवणूक थोडी जास्त असते . परंतु पुढे फारसा खर्च येत नाही . सौर ऊर्जेचा खर्च सदनिकांच्या किमतीतून वसूल केला जाणार आहे . त्यामुळे घराच्या किमती काही प्रमाणात वाढतील .
