आयपीएलचे पुण्यातील सामने दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर

पुणे दि.१० – सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या सहाव्या सिरीजमधील पुण्याच्या गहुंजे येथील स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यांत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याचे गुप्तवार्ता संस्थांकडून सूचित करण्यात आले आहे. या सामन्यांवर दहशतवादी हल्लयांची दाट छाया असून हे हल्ले इंडियन मुजाहिद्दीन आणि पाकिस्तानी लष्करे तैय्यबा कडून होण्याची शक्यता या गुप्तचर संस्थांनी वर्तविली आहे. त्यासंबंधी पुणे ग्रामीण पोलिस विभागालाही अतिदक्षतेचे आदेश दिले गेले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर आयपीएलच्या मॅचेस होत आहेत. गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या सूचनांनुसार या स्टेडियमच्या भागात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहेच पण शहरातील गेस्ट हाऊसेस, हॉटेल्स तसेच सामने पाहण्यासाठी येणार्‍या प्रेक्षकांच्या सामानाच्या झडत्या घेतल्या जात आहेत असे ग्रामीण पोलिस अधीक्षक मनोज कुमार लोहिया यांनी सांगितले.

लोहिया म्हणाले की केवळ पोलिसांनाच नव्हे तर आयोजकांनी जे खासगी सुरक्षा रक्षक नेमले आहेत त्यांनाही कांहीही संशयास्पद वाटल्यास त्वरित झडती घेण्याचे आणि सावध राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. स्टेडियमच्या परिसरात ४०० पोलिस बंदोबस्तावर आहेत शिवाय मैदानाजवळ येऊ पाहणार्‍या प्रेक्षकांना रोखण्यासाठी साध्या वेशातील पौलिसही तैनात करण्यात आले आहेत. वाहनतळांवरील बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.

पुढील वर्षापासून येथे मुख्य प्रवेशद्वारावरंच वरच बंकर्स उभे केले जाणार असून त्यात स्वयंचलित हत्यारे असलेले पोलिस तैनात केले जातील असेही लोहिया म्हणाले. तसेच पोलिस बंदोबस्तासाठी आकारण्यात येणारी रक्कम यंदा सामना संपताच त्वरीत वसूल केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्यावेळी सुरक्षा व्यवस्थेसाठी आकारण्यात आलेली १ कोटी रूपयांची रक्कम वसूल करायला गृह विभागाला फारच त्रास पडला होता व त्यामुळे यंदा ही खबरदारी घेण्यात आल्याचेही त्यांनी सागितले.