थ्रीडीच्या आजच्या जमान्यात आता एका अद्भूत पेनाचीही भर पडली असून या पेनमुळे हवेत चित्रे काढणे अथवा मजकूर लिहिणे आणि तोही थ्रीडी मध्ये शक्य होणार आहे. हे पेन मामॅक्स बॉग आणि पीटर डिलवर्थ या संशोधक जोडगोळीने बनविले असून ते बाजारात येण्यापूर्वीच त्यांच्याकडे ग्राहकांनी पेनासाठी नोंदणी करायला सुरवात केली असून त्यातून आत्ताच त्यांना दोन कोटी डॉलर्स मिळाले आहेत असे समजते.
या पेनमध्ये रंगीत आणि अगदी सूक्ष्म अशा प्लॅस्टीकच्या धाग्याची गुंडाळी बसविण्यात आली आहे. आपण नेहमीच्या पेनात शाई भरतो त्याऐवजी ही गुंडाळी बसविली गेली असून पेन सुरू करताच हा प्लॅस्टीकचा सूक्ष्म धागा तापतो, वितळतो आणि प्लॅस्टीकमध्ये परिवर्तित होतो. पेनमधून बाहेर पडताच या वितळलेल्या प्लॅस्टीकचा हवेशी संयोग होतो आणि तो लगोलग थंड होतो आणि त्याचे घनरूप आपल्याला प्रत्यक्षात दिसते. मग आपण हवेत अक्षरे काढली असतील तर हे घनरूप अक्षरांच्या रूपात पण थ्रीडी प्रतिमेत दिसते, चित्रे किंवा आकृत्या काढल्या असतील तर त्या रूपात दिसते.
यासाठी कोणत्याही खास पृष्ठभागाची गरज भासत नाही आणि त्यामुळे या पेनच्या सहाय्याने आपण कुठेही लिहू शकतो. अर्थात हे तंत्रज्ञान अद्याप बाल्यावस्थेत आहे आणि त्यात आणखी सुधारणा होणे बाकी आहे असेही या संशोधक जोडीचे म्हणणे आहे. मात्र एक नक्की की भविष्यात अशी पेने सर्रास वापरात येतील.