…तर शनिवारवाड्यावर फाशी द्या- लक्ष्मण माने

सातारा: मी आयुष्यात कधी चुकीचे कृत्य केले नाही आणि मरेपर्यंत असे कधीच करणार नाही. ज्या परिस्थिती मी वाढलो जे माझ्यावर संस्कार झाले त्यातून असे काही मी शिकलो नाही. हे माझ्या विरोधात षडयंत्र आहे; असा आरोप लैंगिक छळाचा आरोप असलेले उपराकार माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केला आहे.

प्रा.हरी नरके, बाळकृष्ण रेणके, पल्लवी रेणके आणि माझ्याच संस्थेचे व्यंकप्पा भोसले यांच्यासह काही शिक्षक या षडयंत्रात सहभागी आहेत, असा आरोपही माने यांनी केला. सत्य पडताळून पाहण्यासाठी सीआयडी चौकशी करावी. ज्या महिलांनी माझ्यावर आरोप केले आहेत त्यांचीही चौकशी व्हावी. जर दोषी आढळलो तर मला शनिवारवाड्यावर फाशी द्या, असेही माने यांनी म्हटले आहे. पोलिसांना शरण येण्याअगोदर माने यांनी ही प्रतिक्रिया दिली.

ते पुढे म्हणाले, एखाद्या व्यक्तीला सामाजिक आयुष्यातून उठवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. जेव्हा बाळकृष्ण रेणके यांच्या रेणके समितीचा आमच्या संघटनेला विरोध होता. तेव्हा आम्ही रेणके समितीचा कडाडून विरोध केला. राज्यभर आम्ही रेणके समितीच्या अहवालाची होळी केली. आणि मी २००३ साली बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हापासून मला बदनाम
करण्यात कट रचला जात होता. या कटात प्रा. हरी नरके, बाळकृष्ण रेणके, पल्लवी रेणके आणि माझ्या संस्थेचे व्यंकप्पा भोसले हे सहभागी आहेत.

माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी आमच्या संस्थेच्या घटनेला मंजूर दिली तेव्हा भटक्या विमुक्त जमातीची व्यक्तीच संस्थेची अध्यक्ष होऊ शकते, असे नमूद करण्यात आले होते. त्यामुळे यांच्या तोंडाला पाणी सुटलेले आहे आणि त्यांना असे वाटते की, लक्ष्मण मानेला बाजूला हटवले तर कोट्यवधीची संपत्ती आपल्या हातात येईल; असा आरोप माने यांनी केला.

आज संस्थेची कोट्यवधीची संपत्ती आहे. ७० एकर जागा आहे पण ही काही माझी खाजगी संपत्ती नाही. ती संस्थेची आहे. रेणके यांचा भाचा शिवाजी कोडवी याने संस्थेला खूप त्रास दिला आहे. वीस वर्षापूर्वी ज्यांना काढून टाकले आहे. त्या महिला, पुरूषांना बळजबरीने त्यांनी संस्थेत सहभागी करून घेतले आहे. मी स्वत: अध्यक्षांना या बद्दल वारंवार कळवले; असे सांगून माने यांनी; आता मी वैतागून गेलो आहे; मला संस्थेच्या जबाबदारीतून मोकळे करा, अशी विनंतीही केली होती; असेही संगितले.

लैंगिक अत्याचार आरोप प्रकऱणी लक्ष्मण माने पंधरा दिवसांनी सातारा पोलिसांना शरण आले आहेत. गेले पंधरा दिवस त्यांचा कुठेच पत्ता लागत नव्हता. समाजातल्या विविध स्तरातून ते फरार झाल्याबद्दल टीका होत होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना आवाहन
केल्यानंतर अखेर लक्ष्मण माने पोलिसांना शरण आले. लक्ष्मण माने यांच्याविरुद्ध त्यांच्याच संस्थेतल्या सात महिलांनी लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी केलेल्या आहेत.