‘टुरिंग टॉकिज’ येत्या १९ एप्रिलपासून प्रदर्शित होणार

मराठी प्रेक्षकांना आपला वाटणारा चित्रपट हा अपवादानेच पहायला मिळतो. सध्याच्या चित्रपटांच्या गर्दीत असाच एक अपवाद घडणार आहे येत्या १९ एप्रिलला ‘टुरिंग टॉकिज’ या चित्रपटाच्या निमित्ताने!

चित्रपट अनेक असतात पण महासिनेमा एकच असतो हे वाक्य चपखलपणे लागू असणारा तृप्ती भोईर निर्मित गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘टुरिंग टॉकिज’ हा चित्रपट वेगळ्या विषयामुळे निर्मिती अवस्थेपासूनच चर्चेत आहे. अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट गौरवला जात आहे.

मराठी चित्रपटांचे एक मुख्य आश्रयस्थान असलेल्या ‘टुरिंग टॉकिज’ व्यवसायाच्या पार्श्वभूमीवर आपले टॉकिज, आपला व्यवसाय टिकावा म्हणून रक्ताचे पाणी करणाऱ्या चांदी या मुलीची रंजक, धाडसी संघर्षमय कथा हा चित्रपट पडद्यावर साकारतो. ‘टुरिंग टॉकिज’ अर्थात फिरते तंबू चित्रपटगृह
चालवणाऱ्या या लोकांचा भवताल, त्यांचं राहणीमान, त्यांचा कडवा जीवन संघर्ष असा आजवर मराठीत कधीही न आलेला विषय या चित्रपटात अगदी सहजपणे उलगडतो. प्रेम, राग, लोभ, ईर्ष्या, आसक्ती, अह्कांर अश्या मानवी भावनाची आंदोलन टिपणारा हा चित्रपट आहे.

चांदीची रफ अॅड टफ भूमिका स्वीकारताना आपल्या देखण्या रुपाला बाजूला ठेवून बिनचकचकाटाची व्यक्तिरेखा साकारण्याचे यशस्वी धाडस निर्माती तृप्ती भोईर हिने केले आहे. सुहास पळशीकर, सुबोध भावे, किशोर कदम, मिलिंद शिंदे, वैभव मांगले, नेहा पेंडसे आणि बालकलाकार चिन्मय संत यांनीही या चित्रपटात संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत.

या चित्रपटाची प्रत्येक दृश्य चौकट अमोल गोळे या सध्याच्या आघाडीच्या छायाचित्रकाराने अक्षरश: जिवंत केली आहे.लगान,पिंजर,स्वदेस,जोधा अकबर यासारख्या प्रसिद्ध चित्रपटांचे संकलक बल्लू सलुजा यांनी या चित्रपटाचे संकलन केले असून चित्रपटाचे संगीत आणि पार्श्वसंगीत दक्षिणेतले सुप्रसिद्ध संगीतकार इलया राजा यांचे आहे. या सिनेक्षेत्रातल्या दिग्गजांच्या सहभागामुळे ‘टुरिंग टॉकिज’ हा महासिनेमा सध्याचा बहुप्रतीक्षित चित्रपट ठरला आहे आणि ही प्रतीक्षा संपणार आहे
येत्या १९ एप्रिलला.