अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात सोमवारी महाभियोग


वॉशिंग्टनः अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहात डेमोक्रॅट्सच्या वतीने सोमवारी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग चालविण्याची मागणी करणारा ठराव मांडणार आहेत. पक्षाचे खासदार टेड लीऊ यांनी ही माहिती दिली.

अध्यक्षीय निवडणुकीत बिडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी संसदेचे संयुक्त अधिवेशन सुरू असताना ट्रम्प समर्थकांनी राजधानी परिसरात हिंसक निदर्शने केली. त्यामध्ये ४ जणांचा बळी गेला आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी ट्रम्प यांनी आपल्या हजारो समर्थकांसमोर सुमारे तासभर भाषण केले. या भाषणात त्यांनी ही निवडणूक बिडेन आणि त्यांच्या समर्थकांनी घोटाळा करून जिंकली आहे. वास्तविक आपला शानदार विजय झाला आहे, असा दावा करीत पराभव नाकारला. या भाषणामुळेच राजधानी परिसरात हिंसाचाराला चिथावणी मिळाल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर आहे.

या घटनेनंतर केवळ प्रगल्भ लोकशाही असलेला देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेतच नव्हे तर जगभरात खळबळ उडाली आहे. आगामी काळात ट्रम्प यांच्या प्रक्षोभक विधानांमुळे अधिक हिंसाचार उसळण्याची शक्यता लक्षात घेऊन ‘ट्विटर’ने ट्रम्प यांचे व्यक्तिगत अकाऊंट आणि त्यांच्या समर्थकांचे अकाऊंटही कायमचे बंद केले आहे.

ट्रम्प यांच्या आडमुठ्या आणि लोकशाहीविरोधी कृत्याचा जगभरातून निषेध होत आहे. खुद्द त्यांच्या रिपब्लिकन पक्षातील अनेक महत्वाचे नेतेही त्यांच्या या कृत्याच्या विरोधात आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर महाभियोग चालविला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. हिंसाचाराला चिथावणी दिल्याबद्दल त्यांना गजाआड जावे लागण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.