9 एप्रिलला सहकारी बँका बंद

पुणे, दि. 5 (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने सहकार कायद्यात 97 वी घटनादुरूस्ती करून देशभरात एकच कायदा लागू केला आहे. याची अंमलबजावणी महाराष्ट्रात 15 फेब्रुवारी पासून सूरू झाली आहे. या घटनादुरुस्तीच्या विरोधात सहकारी बँकानी 9 एप्रिल रोजी एक दिवसाचा बंद पुकारला असल्याची माहिती बँक एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सुरेश जगताप यांनी शुक्रवारी दिली.

केंद्र सरकारने सहकार कायद्यात 97 वी घटनादुरूस्ती करताना महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील 73 वे कलम रद्द केले आहे. यामुळे संस्थेच्या संचालक मंडळावर संस्थेचा कर्मचारी प्रतिनिधी असणार नाही. रद्द केलेली ही तरतुद पूर्ववत करावी. डबघाईस आलेल्या सहकारी बँकाना वाचविण्यासाठी ठोस कार्यक्रम सरकारने हाती घ्यावा. आदी मागण्यांसाठी संघटनेचे अध्यक्ष माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव आडसूळ यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनावर 9 एप्रिल रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राज्यभरातील सहकारी बँकाचे, संस्थांचे कर्मचारी सहभागी होणार आहेत. यामुळे या दिवशी बँका बंद राहणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
———————————————–