प्रजासत्ताक दिन सोहळा रद्द का करू नये? शशी थरूर यांचा सवाल


नवी दिल्ली: आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जर उपस्थित राहू शकत नसतील तर या वर्षीचा शासकीय प्रजासत्ताक दिन सोहळा रद्दच का करू नये; असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनी केला आहे. या वर्षी कोरोनाचे संकट असताना लोकांना संचलनासाठी बोलावणे हे बेजबाबदारपणाचे असल्याचेही ते म्हणाले.

या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण करण्यात आले होते. मात्र, ब्रिटनमध्ये नव्या कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर जॉन्सन यांचा दौरा रद्द करण्यात आला. या पार्श्वभूमीवर थरूर यांनी ट्विट करून प्रजासत्ताक दिन सोहळा रद्द करण्याबाबत विचारणा केली आहे.

भारतातही कोरोना संकटाचे सावट कायम असताना संचलनासाठी लोकांना बोलावणेही अयोग्य आहे. समारोपाला प्रमुख पाहुणेही उपस्थित राहू शकणार नाहीत. अशा वेळी हा सोहळा साजरा करण्याची आवश्यकता काय, असा सवाल थरूर यांनी केला आहे.