अज्ञाताने भारतीय लष्कराच्या जवानाचे डोळे काढले

जम्मू: भारतीय लष्कराच्या जवानांवर हल्ले सुरुच असून एका ताज्या बातमीनुसार, पाकव्याप्त काश्मीरपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर अज्ञात व्यक्तीने भारतीय जवानाचे दोन्ही डोळे काढले असून, तो बेशुद्धअवस्थेमध्ये सापडला आहे, उपचारासाठी त्याला लष्कराच्या रुग्णालयामध्ये
दाखल करण्यात आले आहे.

राकेश कुमार असे जवानाचे नाव आहे. जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथे त्याची नियुक्ती होती. उत्तर जम्मूपासून ६० कि.मी. अंतरावर असलेल्या चौकी छौरा येथील गावामध्ये बेशुद्ध अवस्थेत तो सापडला आहे. त्याचे दोन्ही डोळे काढण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस व त्याच्या नातेवाइकांनी दिली आहे.

एक महिन्यापूर्वी सुट्टी काढून तो होळीनिमित्त गावी आला होता. पुन्हा कर्तव्यावर निघाला असताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे त्याचे वडील कुलदीपकुमार यांनी सांगितले. कुलदीपकुमार यांना वाटले की आपला मुलगा सैन्यात पोहचला असेल. बुधवारी त्याचे कोणीतरी निर्दयीपणे दोन्ही डोळे
चाकूने काढले असून त्याला जम्मूतील जीएमसी रुग्णालयात दाखल केल्याच्या वृत्ताने त्यांना धक्काच बसला. राकेशला आता सैन्याच्या सतवारी रुग्णालयातदाखल केले आहे.

दरम्यान, राकेशने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याचे शेजारी मकबूल हुसैन, सरपंच परवेज अहमद, नजीर हुसैन यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर फरार झालेल्या वली मुहम्मद याचा पोलिस शोध घेत आहेत.