अजस्र सौर ऊर्जा प्रकल्प

नवी दिल्ली,दि.4:हिंदुस्थान सॉल्ट लिमिटेड (एचएसएल) या सरकारच्या अखत्यारीतल्या कंपनीने राजस्थानात 15 हजार एकर जमिनीवर 2500 मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी या समूहाने सार्वजनिक क्षेत्रातल्याच भारत हेवी इलेक्ट्रीकल्स (बीएचइएल) या उद्योगाचे सहकार्य घेण्याचे ठरवले आहे. या दोन उद्योगात सहकार्याचा करार करण्याचे काम जारी आहे. ते केन्द्र सरकारच्या अवजड उद्योग खात्याकडूनच होत आहे कारण या खात्याचे या दोन्ही उद्योगांवर नियंत्रण आहे. सौर ऊर्जा तयार करायला पैसे लागत नाहीत. एकदा जमीन मिळाली आणि सुरूवातीचे पॅनेल्स बसवले की त्यावर होणारी गुंतवणूक संपते. नंतर सूर्याच्या किरणांपासून वीज तयार होत राहते. तिला जागा मात्र भरपूर लागते. म्हणून आजवर उभारण्यात आलेल्या अशा प्रकल्पात 10 ते 20 मेगावॉट वीज तयार होते.

महाराष्ट्रात धुळे जिल्ह्यात शिवाजीनगर येथे एक सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे. तो भारतातला सर्वात मोठा प्रकल्प आहे पण, त्यात केवळ 150 मेगावॉट वीज तयार होते. आता राजस्थानात उभारला जात असलेला हा प्रकल्प तर 2500 मेगावॉट क्षमतेचा आहे. तो आशिया खंडातला सर्वात मोठा प्रकल्प आहे पण त्यासाठी तब्बल 15 हजार एकर जागा लागणार आहे. अशा कामासाठी सुपीक जमीन संपादित करून चालत नाही. शिवाय त्याला खास अशी जमीनही लागत नाही. केवळ सोलार पॅनेल बसवता आले पाहिजेत. त्यासाठी पडीक जमीन लागते. आता राजस्थानात अशीच जमीन संपादित करण्यात आली आहे. हा प्रकल्प पुरा झाल्यानंतर गुजरातेत असाच आणखी एक प्रकल्प उभारण्याची योजना आहे. तिच्यासाठी 23 हजार एकर जमीन लागणार आहे आणि तिथे सौर ऊर्जेसोबतच पवन ऊर्जाही तयार केली जाणार आहे.

हिदुस्थान सॉल्टस् लिमिटेड या कंपनीकडे 57 हजार एकर जमीन आहे. त्यातली 15 हजार एकर जमीन या कंपनीने या प्रकल्पाला देऊ केली आहे. भेलने त्यांना सोलार पॅनेल्स तयार करून देण्याचे सहकार्य करावे अशी अपेक्षा आहे. कारण भेलने असे पॅनल्स तयार करून अनेक प्रकल्पांना पुरवले आहेत. एक मेगावॉट वीज तयार केल्यास तिच्यापासून 15 ते 18 लाख युनिट वीज पुरवठा करता येतो. राजस्थानच्या सौर प्रकल्पात 2500 मेगावॉट तर गुजरातेतल्या मिश्र वीज निर्मिती केन्द्रात सुमारे 4 हजार मेगावॉट वीज तयार होईल अशी अपेक्षा आहे.