राज्यातील निर्बंध ३१ जानेवारीपर्यंत कायम; ठाकरे सरकारचा निर्णय


मुंबई – जगावर ओढावलेले कोरोनाचे संकट परतावण्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे पूर्ण जगाची डोकेदुखी वाढवली आहे. त्यातच आपल्या देशातही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळल्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे संकट महाराष्ट्रातही पुन्हा नव्याने निर्माण होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. यामुळेच ठाकरे सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ जानेवारीपर्यंत मिशन बिगीन अगेन लागू राहील, असे जाहीर केले आहे.

मिशन बिगीन अंतर्गत निर्बंध राज्य सरकारने शिथील केले असले, तरी अद्याप काही गोष्टींना परवानगी देण्यात आलेली नाही. मुंबई लोकलचाही यामध्ये समावेश आहे. लवकरच मुंबई लोकल सुरु होईल, असे सांगितले जात असले तरी अद्याप याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच राज्य सरकारने आता राज्यात ३१ जानेवारीपर्यंत सध्या असलेले निर्बंध कायम राहतील, असे स्पष्ट केले आहे.

तसा अधिकृत आदेश राज्य सरकारकडून प्रसिद्द करण्यात आला आहे. त्यांनी यामध्ये राज्य सरकार कोरोनाचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी केलेल्या कामगिरीवर समाधानी असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यातील लॉकडाउन ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढवत असल्याची माहिती दिली आहे.

तसेच याआधी मिशन बिगीन अगेन अंतर्गत ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला निर्बंध शिथील करत प्रसिद्ध करण्यात आलेल्या गाईडलाइन्स ३१ जानेवारीपर्यंत लागू राहतील असे स्पष्ट केले आहे. या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागणार आहे. यासोबतच याआधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रणामे सुरु राहणार आहेत.

कोरोनाबाधितांची दैनंदिन रुग्णवाढ आणि बळींच्या संख्येत देशात दिवसेंदिवस घट होत आहे. मंगळवारी देशभरात १६,५०० रुग्णांची नोंद झाली. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या २,६८,५८१ आहे. इतर देशांच्या तुलनेत आपली स्थिती चांगली असली तरी नव्या करोनामुळे आपण आणखी खबरदारी घ्यायला हवी, असे मत निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केले.