आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचे ३४ खेळाडू ; आज उदघाटन

नवी दिल्ली – भारतीय खेळाडूचा जरी आयपीएलमध्ये वरचष्मा असला तरी यावेळी जवळपास ८८ विदेशी खेळाडू सहभागी होत आहेत. यात ऑस्ट्रेलियाचे तब्बल 34 क्रिकेटपटू आहेत. भारताशिवाय फक्त ऑस्ट्रेलिया असा एकमेव देश आहे, ज्याचा किमान एकतरी खेळाडू प्रत्येक संघात सामील आहे. मुंबई आणी किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन संघाचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियन खेळाडूकडे आहे. दरम्यान आयपीएल स्पर्धेचे आज सॉल्ट लेक स्टेडियम येथे उद्घाटन सोहळा होणार आहे. बॉलीवूडचा स्टार शाहरुख खान, कॅटरिना कैफ आणि आंतरराष्ट्रीय रॅपर पिटबुल मुख्य आकर्षण असतील. कार्यक्रमाला सायंकाळी सात वाजता सुरुवात होणार आहे.

या स्पर्धेत भारताचे १६०, ऑस्ट्रेलियाचे ३४, द. आफ्रिकाचे १५, श्रीलंकेचे १३, वेस्ट इंडीज १३, न्यूझीलंड सहा , इंग्लंड चार, बांगलादेश दोन तर हॉलंडचा एक खेळाडू आहे.दिल्ली डेअरडेव्हिल्सला वगळता जवळपास सर्व संघांमध्ये जवळपास प्रत्येक संघात ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा दबदबा आहे. डेअरडेव्हिल्सकडे फक्त डेव्हिड वॉर्नरच्या रूपाने एकच ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सकडे कर्णधार रिकी पाँटिंगसह सहा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत. ग्लेन मॅक्सवेलवरही सर्वांचे लक्ष असेल.

त्यासोबतच राजस्थान रॉयल्सच्या टीममध्ये शेन वॉटसन, ब्रेड हॉज, ब्रेड हॉग आणि शॉन टॅटसह पाच ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत. मुंबईप्रमाणे किंग्ज इलेव्हन पंजाबची मदार कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या हाती आहे. त्याच्याशिवाय आणखी चार ऑस्ट्रेलियन खेळाडू पंजाब संघात आहेत. चेन्नई सुपरकिंग्ज आणि पुणे वॉरियर्समध्ये प्रत्येकी चार, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, केकेआर आणि हैदराबाद सनरायझर्समध्ये प्रत्येकी तीन ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत.