वडापाव व पिझामधून नवी व्यसने येणे शक्य- औषध प्रशासन आयुक्त महेश झगडे यांचा इशारा

पुणे, दि. १ (प्रतिनिधी) – आगामी काळात रस्त्याच्या कोपर्‍यावर मिळणार्‍या इंस्टंट फूडच्या टपर्‍यातून व्यसनाचे काही प्रकार तरुणांपर्यंत पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फुड, सिरप, फास्ट फुड, इंटरनेट यातील व्यसनाधीनता मोठ्या प्रमाणात दिसून येणार आहे. त्यामुळे आता व्यसनांतील हे नवे प्रवाह वेळीच थोपविण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे, असे मत अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी व्यक्त केले.

पेस (प्रिव्हेंट अ‍ॅडिक्शन थ्रु चिल्ड्रन्स् एज्युकेशन) या संस्थेच्या डॉक्टर्स आणि स्वयंसेवकांनी दीड वर्षापूर्वी व्यसनविरोधी अभियान सुरू केले आहे. वैद्यकीय क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी एकत्र येऊन हे काम करण्याकरीता डिव्हीडी बनविल्या आहेत. ‘पेसं’च्या नवीन फिल्म व्यसनमुक्तीवर आधारित ‘वळण’ फिल्मच्या डिव्हीडीचे प्रकाशन शनिवारी झगडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. राम साठ्ये, स्वाती जोशी, भारती बर्‍हाटे, डॉ. संगीता महाजन आदी यावेळी उपस्थित होते.

झगडे म्हणाले, व्यसनांबाबत समाज, नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांकडून प्रशासनाला प्रश्‍न विचारले जात नाहीत. प्रश्‍न विचारल्याशिवाय समाजात बदल घडणार नाही. जंक फुड, सिरप, मास्ट मुड यामधील व्यसन मोठ्या प्रमाणात पसरू शकते. त्यामुळे याबाबत वेळीच जनजागृती करणे आवश्यक आहे. नागरिक व स्वयंसेवी संस्थांनी व्यसनाधीनता रोखण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकला पाहिजे.