मुंबई दि.१ – केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी यावर्षीसाठी सादर केलेल्या अंदाजपत्रकातील तरतूदी आजपासून लागू होत असल्याने आता यापुढे कारमध्ये बसल्याबसल्या पिझ्झा बर्गर मागविणे, ऑफिस कँटीनमध्ये खाणे अथवा घरी डिलिव्हरी मागविणे ग्राहकांना जादा खर्चिक ठरू शकणार आहे. नवीन अंदाजपत्रकात वातानुकुलित रेस्टॉरंट, हॉटेल्स यावर सेवा कर लागू करण्यात आला असून तो आजपासून लागू होत असल्याने ग्राहकांना खाण्यापिण्याची चैन करताना खिसा हलका करावा लागणार आहे.
हा कर रेस्टॉरंटबरोबरच टेक अवे, इटिग जॉईट्स, होम डिलिव्हरी यांच्यासाठीही लागू होणार का याविषयी अजून गोंधळाचे वातावरण आहे. तज्ञांच्या मते टेक अवे अथवा होम डिलिव्हरी ही रेस्टॉरंटची सेवा नाही. नियमाप्रमाणे उत्पादनाशी सेवा निगडीत असेल तरच सेवा कर लागू होतो. त्यामुळे रेस्टॉरंटला तो लागू होऊ शकेल मात्र होम डिलिव्हरी अथवा टेक अवेला तो लागू होऊ शकणार नाही.
यासंबंधात नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष समीर कुकरेजा यांनी संघटनेने अर्थमंत्री आणि अर्थमंत्रालयशी बोलणी सुरू केली असल्याचे सांगितले. टेक अवे अथवा होम डिलिव्हरी किंवा फूट जॉईटसाठी हा कर लागू करू नये अशी त्यांची मागणी असून ते शक्य नसेल तर निदान कमी कर आकारावा अशी मागणी संघटना करत आहे.