फोर जी स्पेक्ट्रम विक्री – द.आशियात श्रीलंका प्रथम

कोलंबो दि.३० – सर्व देशभर फोर जी नेटवर्क सुरू करण्यासाठी स्पेक्ट्रम विक्री करणारा दक्षिण आशियातील पहिला देश बनण्याचा मान श्रीलंकेने मिळविला आहे. टेलिकम्युनिकेश रेग्युलेटरी कमिशनचे महासंचालक अनुषा पलपिता यांनी ही घोषणा केली आहे.

पलपिता म्हणाले की श्रीलंकेतील सर्वात मोठ्या सेल्युलर ऑपरेटर असलेल्या डायलॉग एक्झिरा या कंपनीला फोर जी स्पेक्ट्रमसाठी कंत्राट देण्यात आले असून त्यापोटी देशाला २६.२५ दशलक्ष डॉलर्स मिळाले आहेत. ही कंपनी युजरना सेवा देणार असून मोबाईल नेटवर्क इंटरनेटचा वेग थ्री जी पेक्षा चार ते पाच पटीने अधिक असेल.

श्रीलंकेने यापूर्वीच फिक्स लाईन टेलिफोनसाठी फोर जी सेवा महत्त्वाच्या शहरात पुरविली आहे. आता मात्र युजरला ही सेवा हातातल्या मोबाईलवरूनही वापरता येणार आहे. विशेष म्हणजे १९८९ सालात दक्षिण आशियात मोबाईल फोन आणण्याचा मानही श्रीलंकेनेच मिळविला होता तसेच २००४ मध्ये थ्री जी नेटवर्क सुरू करण्याचा पहिला मानही श्रीलंकेनेच घेतला होता. देशातील पाच मोबाईल ऑपरेटरना ही सेवा देण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले असून त्यामुळे त्यांची ग्राहकसंख्याही वाढण्यास मदत मिळणार आहे असेही पलपिता यांनी सांगितले.