जपानच्या विद्यापीठासोबत सामंजस्य करार
औरंगाबाद,15 मार्च – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व जपानचे तोकूसिमा विद्यापीठ यांच्यातील महत्त्वपूर्ण सामंजस्य करारावर (दि.15) स्वाक्षरी करण्यात आली. या करारांतर्गत दोन्ही विद्यापीठ संयुक्त संशोधन प्रकल्प राबविणार असून संशोधक विद्यार्थ्यांचे अदान-प्रदान देखील करण्यात येणार आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या कक्षात शुक‘वारी सकाळी संयुक्त बैठक झाली. यावेळी कुलगुरु डॉ.विजय पांढरीपांडे, कुलसचिव डॉ.डी.आर.माने, पदार्थ विज्ञान विभागप्रमुख डॉ.महेंद्र सिरसाट तसेच तोकुसिमा विद्यापीठातील प्रा.री.इची.मुराकामी, प्रा.पंकज कोईणकर यांची उपस्थिती होती. या करारानुसार दरवर्षी साधारणत: तीन विद्यार्थ्यांना तुकोसिमा विद्यापीठात संशोधनासाठी पाठविण्यात येतील. विज्ञान व तंत्रज्ञानातील ’सेन्सर्स, ङ्गोटोव्होलटिक डिव्हाइसेस’ या विषयाचे संशोधन विद्यार्थी घेणार आहे. पदार्थविज्ञान, अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना या करारामुळे जपानमधील नामांकित विद्यापीठात संशोधनाची संधी मिळत असल्याबद्दल या कुलगुरुंनी समाधान व्यक्त केले.
