
मुंबई : 23 डिसेंबर म्हणजेच आजपासून दक्षिण रेल्वेने सर्वसामान्यांना नॉन-पीक अवरमध्ये लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. एका प्रसिद्धीपत्रकात दक्षिण रेल्वेने म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिकांना 23 डिसेंबरपासून चेन्नईच्या उपनगरीय सेवेतील नॉन पीक अवरमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आजपासून चेन्नईत सुरु होणार नॉन पिक अवरमध्ये सर्वसामान्यांसाठी लोकल
यासंदर्भात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट केले असून भारतीय रेल्वे 23 डिसेंबरपासून नॉन-पिक अवरमध्ये चेन्नईमधील सर्वसामान्यांना उपनगरीय रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत असून पुरेशा सुरक्षात्मक उपाययोजना केल्याने लोकांचा प्रवास सुखकर होईल, असे आपल्या ट्विटमध्ये रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे.
रेल्वेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात पहाटेपासून सकाळी सातपर्यंत, सकाळी साडे नऊ ते दुपारी साडेचार आणि संध्याकाळी सात ते शेवटची ट्रेन हे नॉन पिक अवर समजले जातील, असे म्हटले आहे. दरम्यान कोरोनाविषयक नियमावलीचे नागरिकांनी प्रवासादरम्यान पालन करावे, असे आवाहनही रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांनाही पिक अवरमध्ये प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. सकाळी सात ते साडेनऊ आणि दुपारी साडेचार ते सात हे पिक अवर समजले जातील, असे रेल्वेने नमूद केले. दक्षिण रेल्वेने लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
- स्टेशन परिसर आणि ट्रेनमध्ये मास्क न घालता येऊ नये
- ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना गर्दी करु नये
- सोशल डिस्टन्स स्टेशन परिसर आणि ट्रेनमध्ये ठेवावे
- प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना रेल्वे स्थानकांवर आणि प्रवासादरम्यान कागदपत्रे तपासण्यासाठी सहकार्य करावे
