यामुळे अर्णब गोस्वामींच्या चॅनलला ठोठावण्यात आला २० हजार पौंडांचा दंड


ब्रिटन – युकेमधील कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ऑफ कॉमने रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या Worldview Media Network Limited ला तब्बल २० हजार पौंड (जवळपास १९ लाख ७३ हजार रुपये) दंड ठोठावला आहे. युकेमधील रिपब्लिक भारतची वर्ल्डव्यू मीडिया नेटवर्ककडे जबाबदारी आहे. युकेमधील हिंदी भाषिकांपर्यंत रिपब्लिकचा या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न आहे. हा दंड प्रसारणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठोठावण्यात आला आहे.

रिपब्लिक भारतचा ६ डिसेंबरला ‘पूंछता है भारत’ कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. पाकिस्तानी नागरिकांविरोधात या कार्यक्रमात द्वेषयुक्त आणि भडकवणारी भाषा वापरत प्रसारणाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. कारवाईची माहिती देत कम्युनिकेशन्स नियामक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे की, चॅनेलला यावर ऑफ कॉमने स्पष्टीकरण देण्यास सांगितले असून तो कार्यक्रम पुन्हा प्रसारित न करण्याच्या सूचना केल्या आहेत.

यासंदर्भात ऑफ कॉमने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या चांद्रयान २ मोहिमेसंदर्भात कार्यक्रम करताना रिपल्बिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींनी भारताच्या अवकाश तसेच तांत्रिक विकासाची पाकिस्तानशी तुलना केली होती. पाकिस्तानकडून भारताविरोध होणाऱ्या दहशतवादी कारवायांचाही त्यात उल्लेख होता.

अर्णब गोस्वामी आणि सहभागी पाहुण्यांना चर्चेदरम्यान केलेल्या कमेंट पाकिस्तानी लोकांविरोधात द्वेष निर्माण करणाऱ्या असल्याचे ऑफ कॉमने सांगितले आहे. पाकिस्तानी नागरिकांचा उल्लेख कार्यक्रमात वारंवार दहशतवादी, माकड, गाढव, भिकारी आणि चोर असा करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

अर्णब गोस्वामी यांनी कार्यक्रमात पाकिस्तानचे शास्त्रज्ञ, डॉक्टर, नेते त्यांचे खेळाडूदेखील सर्वजण दहशतवादी आहेत. तेथील प्रत्येक लहान मूल दहशतवादी आहे. दहशतवाद्यांविरोधात तुम्ही लढत असल्याचे म्हटल्याचा उल्लेख ऑफ कॉमने प्रसिद्धीपत्रकात केला आहे. ‘पाकी’ शब्दाचा उल्लेख कार्यक्रमात केल्या बद्दलही ऑफ कॉमने आक्षेप नोंदवला आहे. हा वर्णद्वेषी शब्द असून युकेमधील नागरिकांना मंजूर नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.