नवी दिल्ली- ‘गेल्या काही दिवसापासून मीडियातून पंतप्रधान होण्यास राहुल गांधी कचरत असल्याच्या अफवा पसरविण्यात आल्या आहेत. सध्या राहुल गांधी पक्ष संघटनेला प्राधान्य देत असले तरी पंतप्रधान होण्यास त्यांची काहाही हरकत नाही. त्यास राहुल यांनी माझ्याशी बोलताना दुजोरा दिला आहे,’ असे मत काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले.
दिग्विजय सिंह यांनी नुकतीच त्यांनी एका वर्तमानपत्राला विशेष मुलाखत दिली आहे. ते म्हणाले ‘ पक्ष बांधणीचे कामे करीत असल्याने राहुल पंतप्रधान होण्यास उत्सुक नसल्याचा अर्थ मीडियाने लावला आहे. मीडियाने त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लोकहिताची कामे पंतप्रधान होऊनही करता येतात. त्यामुळे आगामी काळात हे पद स्वीकारण्यास राहुल यांची काहीच हरकत नाही.’
याबाबत पुढे बोलताना त्यांनी काँग्रेसचा पंतप्रधान गांधी परिवाराच्या बाहेरचा असल्याने पक्षात दोन सत्ता केंद्रे निर्माण झाली आहेत. त्यातून काँग्रेस पक्षाचे नुकसान होत आहे. त्यामुळे पक्ष आणि सरकारचा प्रमुख एकच व्यक्ती असावा, अशी भावना पक्षात असल्याने राहुल पंतप्रधान होतील असे दिग्विजय यांनी स्पष्ट केले.