मुशर्रफ पाकला वाचवणार ?

पाकिस्तानचे परांगदा झालेले माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ हे आता पाकिस्तानात परतले असून त्यांनी पाकिस्तानात होत असलेल्या सांंसदीय निवडणुकीत उतरण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी चार वर्षांनंतर देश सोडला आणि आता ते परतत आहेत. पाकिस्तानचे एक वैशिष्ट्य आहे की तिथे पायउतार झालेला अध्यक्ष किंवा पंतप्रधान जर कट कारस्थानातून पायउतार झाला असेल तर तो त्या देशात राहूच शकत नाही. ही परंपरा गेल्या 60 वर्षांपासून जारी आहे. तो त्या कारस्थानातून जिवंंत राहिला तर तो परदेशी पळून जातो किंवा मारला गेला तर त्याच्या कोठे जाण्याचा प्रश्‍नच येत नाही. अगदी गेल्या 40 वर्षांच्या इतिहासावर नजर टाकली तर असे लक्षात येते की पाकिस्तानचे एक माजी पंतप्रधान त्यांच्या विरोधात कारस्थाने झाल्यामुळे पायउतार झाले ते सरळ बि‘टनमध्ये गेले आणि तिथे एक खानावळ काढून तो धंदा करीत बसले. काही पंतप्रधान आणि अध्यक्षांनी पदावर असतानाच एवढी माया कमावलेली असते की ते परदेशात चांगल्या मालमत्ता खरेदी करतात आणि राजकारणातून बाद झाले की तिथे आपल्या त्या घरांत जाऊन राहतात.

ज्यांना अशी मालमत्ता कमावणे शक्य होत नाही त्यांनी कोणत्या तरी देशाच्या सरकारला विनंती करून तिथे आश्रय मिळवलेला असतो. पाकिस्तानातले माजी पंतप्रधान, माजी अध्यक्ष आणि सत्ता गेल्यानंतरची त्यांची स्थिती यावर मोठे मनोरंजक पुस्तक लिहिता येईल. 1972 च्या भारत पाक युद्धानंंतर पाकिस्तानात चांगली घटना तयार करून तिच्या आधारे देशाची उभारणी करण्याचा प्रयत्न झुल्फीकार अली भुट्टो यांनी केला पण तो फसला आणि त्यांना पदच्युत व्हावे लागलेे. त्यांच्या जागेवर आलेल्या याह्याखान यांनी पाकिस्तानला आपल्या पोलादी पंज्यात ठेवून त्यावर एका बाजूने इस्लामचा तर दुसर्‍या बाजूने लष्कराचा असा दुहेरी दबाव ठेवला. त्यांना भुट्टो यांनीच चौघांची सेवा ज्येष्ठता डावलून लष्कर याह्याखान यांनी या उपकाराची परतफेड खासी केली आणि त्यांच्यावर खोटा खुनाचा आरोप लावून त्यांना फाशी देऊन त्यांचा काटा काढला. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानला पूर्ण दहशतवादाच्या मार्गावर आणले. आज पाकिस्तानात जे अराजक पसरले आहे त्याचे बीज याह्याखान यांच्या राजवटीत आहे. जे पेरले ते तसेच उगवते. याह्याखान यांनी जे पेरले ते त्यांच्याच नाशाला कारणीभूत ठरले.

1988साली याह्याखान यांचे विमान उलटून त्यात ते मारले गेले. ते कसे मेले आणि हा अपघात कसा झाला याची काहीही चौकशी झालेली नाही. या घातपाताबद्दल पाकिस्तानात कोणाला साधी कैदेचीही शिक्षा झाली नाही. परंतु याह्याखान यांच्या राजवटीत भुट्टो कुटुंबातल्या सर्वांना परदेशात आश्रय घेेऊन रहावे लागले होते. ते पाकिस्तानात आले असते तर त्यांना याह्यांनीच मारले असते. याह्याखान यांच्या हत्येनंतर बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानात आगमन केले पण आपला भाऊ मीर मूर्तजा याला पाकिस्तानात येऊ दिले नाही. याह्याखान यांच्या माघारी बेनझिरला सत्ता मिळाली खरी पण तिला आपल्या भावाचाच भरवसा नव्हता. परदेशात न राहवून तो मायदेशी आला पण त्याच्या मेव्हण्याने म्हणजे आता अध्यक्ष असलेल्या आसिफ अली झरदारी यांनीच त्याचा काटा काढला आणि आपल्या बायकोचा मार्ग निर्वेध केला. दरम्यान भुट्टो कुटुंबातल्या आणखी एकाचा फार पूर्वीच बेनझीरच्या सल्ल्यानेच काटा काढण्यात आला होता. पेरले तसे उगवते याचा अनुभव बेनझीरलाही घ्यावा लागला. 2006 साली तिची हत्या झाली. याही हत्येबद्दल कोणाला शिक्षा झाली नाही आणि कोणाची चौकशीही झाली नाही. दरम्यानच्या काळात मुशर्रफ यांनी 2000 साली नवाज शरीफ यांना हटवून सत्ता हस्तगत केली होती. या सत्तांतराच्या वेळीही नवाज शरीफ यांच्या जीवाला धोका होता पण त्यांना कुवेतच्या शेखांनी अभय मिळवून दिले. जीवानिशी न मारण्याचे आश्‍वासन मुशर्रफ यांच्याकडून घेतले.

नवाज शरीफ निसटले. मुशर्रफ यांनी त्यांना सोडले आणि पाकिस्तानात सात वर्षे लष्करी सत्ता चालवली. त्यांनाही 2008 साली सत्तांतर झाल्यावर पळून जावे लागले. ते बि‘टनमध्ये अज्ञातवासात रहात होते. आता पाकिस्तानात जे अराजक पसरले आहे ते आपणच निस्तरू शकतो असे त्यांना वाटायला लागले आहे. मायदेशापासून दूर सुरक्षित असलो तरीही आपले मन रमत नाही म्हणून जीवाला धोका असला तरीही ते आता पाकिस्तानात परतले आहेेत. त्यांचा जीवही धोक्यात आहे. कारण त्यांनी सत्तेवर असताना अमेरिकेच्या तालावर नाचत पाकिस्तानातल्या इस्लामी अतिरेक्यांच्या विरोधात कारवाई केली होती. तेव्हापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरील स्वात खोर्‍यातले दहशतवादी त्यांना मारायला टपले आहेत. मुशर्रफ यांच्या हत्येचे दोन प्रयत्नही झाले होते. पण त्यातून ते बचावले. हे अतिरेकी आता त्यांना मारणार आहेतच पण बेनझीर भुत्तो यांचा काटा त्यांनीच काढला असा त्यांच्यावर आरोप आहे आणि भुट्टो यांचे समर्थकही त्यांना मारायला टपले आहेत. पाकिस्तानात कोणीही सत्तेवर आला की तो असा काही कारभार करतो की त्याचा जीवच धोक्यात येतो. मुशर्रफही त्याला अपवाद नाहीत.