अमेरिका एचवन बी व्हिसा दुप्पट करणार

वॉशिग्टन दि.२१ – अमेरिकेने परदेशातील अतिकुशल कर्मचाऱ्याना देण्यात येणार्याे एचवन बी व्हिसाची संख्या दुपटीवर नेण्याचा विचार चालविला असून हा तंत्रज्ञान उद्योगाचा  मोठा विजय मानला जात आहे. याचा मोठा फायदा भारतालाही मिळणार आहे.

बायपार्टीझन सिनेट इमिग्रेशन प्लॅन नुसार आठ सिनेटरनी हा प्रस्ताव मांडला असून त्याचबरोबर अमेरिकन विद्यापीठातून पदवी घेणार्याे परदेशी विद्यार्थ्यांना कायम कायदेशीर निवासाची परवानगी देण्याबाबतही विचार केला जात आहे असे समजते. अर्थात या साठी विद्यार्थ्यांनी सायन्स, इंजिनिअरींग, तंत्रज्ञान, गणितातील पदवी घेणे अपेक्षित आहे.

अमेरिकेने एचवन बी व्हीसाची संख्या कमी करून ती दरवर्षाला ६५ हजारांवर आणली होती. नव्या प्रस्तावानुसार ती जवळजवळ दुप्पट होणार आहे. या व्हीसाच्या माध्यमातून भारतातील अनेक तंत्रज्ञान सल्लागार कंपन्या त्यांचे कर्मचारी अमेरिकेत नेऊन तेथे प्रशिक्षित करतात आणि तेच काम करण्यासाठी पुन्हा भारतात आणतात. यामुळे कमी पगारावर अतिकुशल कर्मचारी कंपन्यांना सहज उपलब्ध होतात. हा कालावधी साधारण तीन वर्षांचा असतो. त्याचा फायदा आऊटसोअर्सिग करणाऱ्या कंपन्यांनाही होतो व पगारावर होणारा मोठा खर्च त्यांना वाचविता येतो.

इंटेल, गुगल, आयबीएम व अन्य तंत्रज्ञान कंपन्यांशी सहयोग असलेल्या कोम्पिट अमेरिका या कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर स्कॉट कार्लेस यांनी सिनेटरनी मांडलेल्या या प्रस्तावाचे स्वागत केले आहे. सिटीझन शिप देण्याबाबतही मांडलेली योजना त्वरीत राबविली जाण्याची शक्यताही वर्तविली जात असून त्यामुळे लाखो स्थलांतरीतांना नागरिकत्व मिळणे शक्य होणार आहे. त्यात भारतीयंची संख्या २ लाख ५० हजार इतकी आहे.