गुगल आणणार २७०० रूपयांत स्मार्टफोन

नवी दिल्ली दि. २१ – सर्च इंजिन गुगलचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन एरिक श्मिड यांनी वेब ब्राऊझरसह अँड्रॅईड स्मार्टफोन केवळ २७०० रूपयांत देणे शक्य असल्याचे जाहीर केले असून हा फोन लवकरच बाजारात आणला जाईल असे सांगितले आहे. डॉलर्समध्ये किंमत देताना या फोनसाठी ५० डॉलर्स द्यावे लागतील असे त्यांचे म्हणणे आहे. या फोन संबंधी अन्य माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही.

एरिक म्हणाले की गुगलने नेहमीच मोबाईल हँडसेट बनविणाऱ्या कंपन्यांना स्वस्तातील हँडसेट बनविण्यास प्रोत्साहन दिले आहे. भारतात स्मार्टफोनचा वापर वाढता आहे आणि मोबाईल कॉम्प्युटिग करणाऱ्याचे प्रमाणही अतिशय वेगाने वाढत आहे. अशावेळी स्वस्तातील आणि सर्वसामान्यांना सहज परवडणार्याह किमतीत हे फोन उपलब्ध करून दिले तर मोबाईल बेस्ड इंटरनेट तळागाळापर्यंत पाहोचू शकणार आहे.

यासाठी मोबाईल अॅप्लिकेशन बनविणाऱ्या डेव्हलपर्सनी बरेच काम करणे अपेक्षित आहे आणि या तंत्रज्ञानाकडे कोणतीच मोबाईल कंपनी दुर्लक्ष करू शकणार नाही. अँड्राॅईड सध्या बाजारात नंबर वन कंपनी असून अनेक उपकरणात त्यांची सिस्टीम वापरली जात आहे. एरिक यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर संशोधन होण्याची गरजही बोलून दाखविली असून ते म्हणाले की संगणकाने युजरने काय करावे, काय बोलावे, बोलण्यात काय चुकले, कोणाची भेट घेणे फायद्याचे हे युजरला सांगितले पाहिजे अशी अपेक्षा आहे.