रवी राणांच्या पोशाखावर विधानसभा अध्यक्षांचा आक्षेप; दिले सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश


मुंबई – सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राज्याच्या विधानसभेच्या दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जोरदार खडाजंगी झाली. आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन परिधान केलेल्या पोषाखावरुनही सभागृहात वाद झाल्याचे पाहायला मिळाले.

रवी राणा यांनी “शेतकऱ्यांचे मरण, हेच राज्य सरकारचे धोरण. उद्धवा अजब तुझे सरकार”, अशा आशयाचा बॅनर असलेला पोषाख परिधान केला होता. रवी राणा यांच्या या पोषाखावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आक्षेप घेत त्यांना सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले. रवी राणा यांनी विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेनंतरही सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू ठेवली. सत्ताधारी यावरुन आक्रमक झाले आणि राणा यांना निलंबित करण्याची मागणी केली.

यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. रवी राणा यांची कृती योग्य नसली तरी त्यांनी मांडलेला मुद्द्याचा आपण विचार करायला हवा, असे सांगत फडणवीस यांनी रवी राणा यांना सभागृहाबाहेर जाऊन, तो पोषाख उतरविण्याची विनंती केली. तरीही गोंधळ थांबताना दिसत नसल्याने नाना पटोले यांनी उभे राहून सभागृहातील सदस्यांना कडक सूचना दिल्या. रवी राणा यांची कृती योग्य नसून अशापद्धतीचे पोषाख परिधान करुन कुणी सभागृहात येण्याचा प्रयत्न करत असेल तर यापुढे त्यांना गेटवर थांबविण्यात यावे, असे आदेश नाना पटोले यांनी गेट मार्शलला दिले.