तापमानातील घट, प्रदूषणामुळे डिसेंबरअखेर वाढणार कोरोनाचा धोका


मुंबई : वैद्यकीय तज्ज्ञांनी राज्यासह मुंबईत दिवाळीनंतर कोरोना प्रादुर्भाव वाढेल, अशी शक्यता वर्तविली होती. पण समाधानकारक बाब म्हणजे, तज्ज्ञांनी वर्तविलेल्या शक्यतेनुसार राज्यासह मुंबईमधील कोरोनाबाधितांची संख्या व मृत्यू दरात म्हणावी तेवढी वाढ झाली नसल्याचे समोर आले. आता डिसेंबरअखेर कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तविली.

राज्याच्या टास्क फोर्समधील डॉ. शशांक जोशी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढलेला आहे, असे म्हणता येणार नाही. पण राज्यातील तापमानात घट झाल्यास शिवाय प्रदूषणात वाढ झाल्यास कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते. यापूर्वी कोरोनाच्या संसर्गाची तीव्रता मे, जून आणि सप्टेंबरमध्ये वाढली होती. प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोरोना चाचणीसह उपाययोजनांवर भर दिला. शिवाय ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’सारखे अनेक उपक्रम हाती घेऊन जास्तीत जास्त सातत्याने भर देण्यात येत आहे.