नवी दिल्ली: हेलिकॉप्टर खरेदी लाच प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने निवृत्त हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एस. पी. त्यागी यांची चौकशी केली. त्यागी यांनी आपल्यावरील सर्व आरोप नाकारले. तरीही प्राथमिक माहितीवरून हवाई दल प्रमुख आणि त्यांच्या चुलत बंधूंच्या सहभागाबद्दल शंका घेण्यास वाव असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सूचित केले.
ओगस्टा वेस्ट्लेण्ड या कंपनीकडून अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या ३ हजार ६०० कोटी रुपयाच्या व्यवहारात ३६० कोटी रुपयांची लाच दिल्यावरून इटलियन न्यायालयात खटला सुरू आहे. या प्रकरणात त्यागी यांच्या चुलत भावाला ७ कोटी २० लाख रुपयांची रक्कम रोख स्वरूपात देण्यात आली. ही रक्कम पुढे हवाई दल प्रमुखांकडे पोहोचविण्यात आली; असा इटालियन तपास यंत्रणांचा दावा आहे.
त्यानुसार सीबीआय देखील हवाई दल प्रमुखांबरोबरच त्यांची भावंडे ज्युली, राजीव आणि डोस्का त्यागी यांच्याकडे चौकशी करीत आहे. त्यागी यांनी सन २००६ मध्ये कंपनीला अनुकूल अटींचा समावेश करून फेरनिविदा काढल्याने कंपनीला प्रतिस्पर्धी उरला नसल्याचा आरोप हवाईदल प्रमुखांवर आहे.
एअर चीफ मार्शल त्यागी यांनी मात्र आपल्यवरॆल आरोप फेटाळले आहेत. कंपनीबरोबर आपण निवृत्त झाल्यानंतर ३ वर्षांनी हेलिकॉप्टर खरेदीचा करार झाल्याचे त्यांनी आपल्या बचावात सांगितले.