
मुंबई – लॉकडाऊननंतर अनलॉक अंतर्गत देशातील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच राजधानी दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वेगाने होत असून, दिल्लीपाठोपाठ मुंबईतही कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मुंबईतसह राज्यातही कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आल्यामुळे राज्य सरकार मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता असल्याचे वृत्त इंडिया टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत वाढ; राज्य सरकार बंद करणार मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा ?
दिल्लीत दिवाळीच्या आधीच कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होण्यास सुरूवात झाली होती. दिल्लीत गेल्या दहा दिवसांत ६० हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीबरोबरच मुंबईसह महाराष्ट्रातही रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्य सरकार कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन दिल्ली-मुंबई हवाई व रेल्वे सेवा बंद करण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य सरकार असा निर्णय दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे घेण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारकडून लवकरच मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्यासंदर्भातील आदेश काढण्यात येतील, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. मागील २४ तासात दिल्लीत तब्बल ७ हजार ५०० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दिल्लीतील कोरोनाबाधितांच्या संख्येत २८ ऑक्टोबरपासून वाढ होत आहे. दिल्लीत सुरूवातीला एकाच दिवसात ५००० रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर ११ नोव्हेंबरपर्यंत २४ तासात आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येने ८ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.
