नवी दिल्ली: अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठींच्या हेलिकॉप्टर्सच्या सुमारे ३ हजार ६०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या चौकशीत भारतीय हवाई दल आणि संरक्षण लेखा विभागातील अधिकारी मदत करणार आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने आपल्या प्राथमिक तपासात (पीई) संशयितांची तपासणी करण्याची तयारी केल्याच्या पार्श्वभूमीवर हे अधिकारी तपासंस्थेला मदत करणार आहेत.
ऑगस्टा वेस्टलँड कंपनीचे उपकंपनी असलेल्या फिनमेक्कानिका आणि मिलान या कंपन्यांकडून गोळा केलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी हवाई दल तसेच संरक्षण लेखा विभागाचे काही अधिकारी सीबीआयच्या पथकाला मदत करतील; असे तपाससंस्थेच्या सूत्रांनी सांगितले. सध्या या पथकाला आयकर खात्याचे पथकही मदत करत आहे.
ऐरॉमॅट्रिक्स आणि आयडीएस इन्फोटेक या कपंनीच्या अधिकार्यांचीही सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे. सीबीआयच्या पीईमध्ये माजी हवाईदल प्रमुख एस. पी. त्यागी आणि त्यांच्या तीन भावांसह ११ जणांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय सीबीआयने चार कंपन्यांवरही याप्रकरणी ठपका ठेवला आहे. या चौकशीस सहाय्य करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने यापूर्वीच सीबीआयला ऑगस्टा वेस्टलँडची तपासासंदर्भातील कागदपत्रे सीबीआयला उपलब्ध करून दिली आहेत.
सन २००९ मध्ये अतिमहतत्त्वाच्या व्यक्तींसाठीच्या हेलिकॉप्टर्समध्ये आसनव्यवस्थेत सुचविण्यात आलेले बदल आणि हवाई वैद्यकीय यंत्रणेच्या अतिरिक्त मागणीमुळे त्यांच्या किमतीत ३०० कोटी रुपयांनी वाढ झाल्याचे उघड झाले आहे. एडब्लू -१०१ या हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसंबंधातील कागदपत्रांतून या दोन आसनी हेलिकॉप्टर्सची ही क्षमता दुप्पट करून चारआसनी करण्याची सूचना करण्यात आली होती. त्याचप्रमाणे या हेलिकॉप्टर्समध्ये औषधोपचारासाठी रुग्णाला हवेतून हलविण्याच्या वैद्यकीय सुविधा देण्याच्या सूचनेचाही समावेश करण्यात आला होता; असे उघडकीस आले आहे.