देशापेक्षा परिवाराचे हित ही गांधी घराण्याची परंपरा: मोदी

नवी दिल्ली: देशाचे हित पणाला लाऊन आपल्या परिवाराचे हित साधण्याची गाधी घराण्याची परंपरा असून मनमोहन सिंग हे गांधी घराण्याचे ‘नाईट वॉचमन आहेत; अशा शब्दात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गांधी परिवार आणि काँग्रेस पक्षावर विखारी टीका केली. या टीकेने काँग्रेस नेत्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होता असून मोदी हे साप आणि विंचवाप्रमाणे विषारी असल्याची टीका मणिशंकर अय्यर यांनी केली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत नुकतेच मोदींचे गोडवे गाण्यात आले. पंतप्रधान पदासाठी मोदींचे नाव जाहीर करण्यात आले नसले तरीही सन २०१४च्या निवडणुकीत मोदींचे स्थान महत्वाचे असणार याचे संकेत या बैठकीत देण्यात आले. या बैठकीचा समारोप करताना मोदी यांनी गांधी घराणे आणि काँग्रेस पक्षाला लक्ष्य करून निवडणुकीतील प्रचाराची दिशाच जणू स्पष्ट केली आहे.

मनमोहन सिंग याच्या ऐवजी प्रणब मुखर्जी पंतप्रधान झाले असते तर देशाचे कमी नुकसान झाले असते. मात्र मुखर्जी गांधी घराण्यासाठी कामाचे नसल्याने त्यांना पंतप्रधान केले गेले नाही; असा आरोप मोदी यांनी यावेळी बोलताना केला. मनमोहन सिंग हे गांधी घराण्याच्या हातातील बाहुले असल्याची टीकाही त्यांनी केली.

महागाई आणि भ्रष्टाचार या मुद्द्यावरून मोदी यांनी केंद्र सरकारवरही तोफ डागली. सर्वसामान्य गरीब जनता महागाई आणि दरवाढीच्या बोज्याखाली चिरडली जात आहे. मात्र केंद्र सरकारला याची जाणीव तरी आहे काय; असा सवाल मोदी यांनी केला. काँग्रेसपासून देशाला वाचविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी घाम गाळण्याची गरज असल्याचेही मोदी म्हणाले.

मोदी यांचे नाव पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्याची मागणी अनेक नेते, कार्यकर्ते करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी मात्र; पक्षाला विजय मिळविणे हे आपले ध्येय आहे. पंतप्रधान कोण; हा मुद्दा गौण आहे; असे आपल्या भाषणात सांगितले

मोदींच्या कठोर टीकेला प्रत्युत्तर देताना अय्यर यांनी मोदींची साप आणि विंचवाशी तुलना करीत भाजप हा मुस्लिमांना मारणारा पक्ष असल्याचा आरोप केला. संसदीय कार्यमंत्री राजीव शुक्ला यांनी; मोदी हे अहंकाराच्या नशेत बरळत असल्याचा आरोप केला; तर भाजपमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करू शकेल असा नेता नसल्याने त्यांना काँग्रेसच्या नेत्यांच्या नावाचा आधार घ्यावा लागत असल्याचे काँग्रेस प्रवक्ता रशीद अल्वी यांनी सांगितले.