शरद पवारांनी टाकला वादावर पडदा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या वादावर केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पडदा टाकला आहे. राज यांच्या पुणे प्रवेशावरून आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याच्या सूचना पवारांनी दिल्या आहेत. शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांनी ही माहिती पत्रकाव्दारे दिली.

राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते अंकुश काकडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुण्यात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा दिला होता. मात्र, राज यांनी जशास तसे उत्तर देताना आम्हाला कोणाची परवानगी नको. मी ७ तारखेला पुण्यात येतोय. कोण मला अडवतो ते पाहतो. अडवून दाखवाच; असे प्रतिआव्हान दिले. त्यामुळे राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यातील वाद शिगेला पोहचण्याची शक्यता निर्माण झाली.

राष्ट्रवादी पक्ष हा लोकशाही आणि भारतीय राज्यघटनेवर विश्वास ठेवणारा आहे. प्रत्येक नागरिकाला भारतात कुठेही जाण्याचा आणि विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. जनता दुष्काळात होरपळत असताना त्यावर राजकीय पोळी भाजण्याची आमची प्रवृत्ती नाही. अशा परिस्थितीत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचे काम काही पक्ष जाणीवपूर्वक करीत आहेत; असा आरोप राष्ट्रवादीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केला आहे.

हा टोला मनसे आणि शिवसेनेला नाव न घेता राष्ट्रवादीने लगावला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संयम दाखवून दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात आपली शक्ती वापरण्याचा प्रयत्न करतील; असे राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.