मनसेची नागपूरमधील सभा रद्द; ‘राज’ मात्र गुपित

नागपूर: राज्यातील आघाडी सरकारवर आणि विशेषतः राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करणारे मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांची येत्या १५ मार्च रोजी नागपूर येथे होणारी जाहीर सभा रद्द करण्यात आली असल्याचे समजते. त्यांचा दौरा मात्र निश्चित आहे . मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याच्या पार्श्वभूमीवर सभा रद्द झाल्याची जोरात चर्चा सुरू झाली. मनसे पदाधिका-यांनी त्याचा इन्कार करत ही सभा आधीच रद्द झाल्याचा दावा केला असला तरी ही सभा रद्द होण्यामागील ‘राज’ मात्र गुपितच ठेवण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे सध्या राज्यव्यापी दौरा करीत आहे . सध्या पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात त्यांचे दौरे झाले . या सर्व ठिकाणी त्यांच्या सभा गाजल्या. यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार , गृहमंत्री आर. आर. पाटील यांना लक्ष्य केले . दोन दिवसांपूर्वी अहमदनगर येथे राज यांच्या कारवरील दगडफेकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला . त्याचे पडसाद राज्यभर उमटले . त्यामुळे सभा रद्द होताच उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे . राज यांची १५ मार्चची नागपुरातील सभा बरीच आधी जाहीर झाली . त्यानुसार संपर्क प्रमुख अविनाश जाधव यांनी बैठक घेऊन तयारी सुरू करून वातावरण निर्मिती सुरू झाली होती .

त्यांची नागपुरातील जाहीर सभा रद्द होण्याचे ‘राज ‘ मात्र उघड करण्यात आले नाही. राज यांचे १४ तारखेला नागपूरमध्ये आगमन झाल्यानंतर दुस-या दिवशी जाहीर सभेऐवजी नागपूर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. त्यांची सभा रद्द झाल्याने नेते व कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. विदर्भात त्यांची २५ मार्चला अमरावती येथे सभा होईल.