रेल्वेमंत्री दूर करणार राष्ट्रवादीची नाराजी

नवी दिल्ली- नुकत्याच सदर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्‍ट्राच्या तोंडाला पाने पुसल्यामुळे राष्‍ट्रवादी काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे राष्‍ट्रवादीसोबत कोणत्याही मुद्द्याच्या सोडवणुकीसाठी चर्चेस तयार असल्याचे केंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी म्हटले आहे. रेल्वे अर्थसंकल्पानंतर राष्‍ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निराशा व्यक्त केली होती. त्यामुळे आता खुद्द रेल्वेमंत्री नाराजी दूर करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

यावेळी बोलताना रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल म्हणाले, ‘अ‍ॅडव्हान्स रिझर्व्हेशनची कालावधी कमी करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा विचार आहे. सध्याच्या १२० दिवसांवरून ही मुदत ३० दिवसांची करण्याचा विचार आहे. चार महिने आधी प्रवासाचे नियोजन केले जात नसते हे मलाही मान्य आहे. यदाकदाचित झाले तरी काही तरी अडचण येणे सामान्य बाब आहे. चार महिने आधी आरक्षण करण्यात लोकांना अडचण येत असल्याचे दिसते. त्याचा फायदा दलाल घेतात. सुरुवातीला ही मुदत ९० दिवस, त्यानंतर ६० दिवस आणि गरज भासल्यास आगामी काळात हे ३० दिवसांवर आणण्यात येणार आहे.

रेल्वेने मुंबईतील ८० लाख रेल्वे प्रवाशांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे असे राष्ट्रवादीने म्हटले होते. ही रेल्वेकडून देण्यात येणारी वागणूक अयोग्य असल्याचे त्यांनी ही म्हटले होते. रेल्वे अर्थसंकल्पाबाबत काही त्रुटी असेल तर राष्‍ट्रवादीच्या कोणत्याही खासदार अथवा त्यांनी ठरवून दिलेल्या राज्य प्रतिनिधीशी चर्चेसाठी तयार असल्याचे बन्सल यांनी स्पष्ट केले.