माजी हवाईदल प्रमुख सीबीआयच्या रडारवर

नवी दिल्ली: ऑगस्टा हेलिकॉप्टर घोटाळ्यासंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्राथमिक माहिती अहवाल दाखल केला. यामध्ये भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख एस. पी. त्यागी यांच्यासह अकरा जणांची नावे संशयित म्हणून घालण्यात आली आहेत.

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी खरेदी करावयाच्या हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात लाचखोरी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. ऑगस्टा वेस्टलँड या इटालियन कंपनीशी झालेला हा खरेदी व्यवहार तब्बल ३ हजार ६०० कोटी रुपयांचा आहे. या कंपनीला अनुकूल व्यवहार व्हावा यासाठी काही दलालांनी प्रयत्न केला. या दलालांना ऑगस्टा वेस्टलँडची मातॄकंपनी असलेल्या फिनमेक्कानिकाने सुमारे ५० कोटी रुपये दिले. त्यातील मोठी रक्कम सात भारतीयांना हस्तांतरित करण्यात आली, असा आरोप आहे.

या व्यवहारातील घोटाळ्यावरून राजकीय वातावरण तापले. या पार्श्‍वभूमीवर, याप्रकरणी माहिती गोळा करण्यासाठी सीबीआयचे पथक इटलीला गेले होते. तेथून काही कागदपत्रे मिळाल्यानंतर सीबीआयने अहवाल दाखल केला आहे. त्यात त्यागी, त्यांचे काही नातलग, युरोपीय दलाल यांच्याबरोबरच फिनमेक्कानिका, ऑगस्टा वेस्टलँड आदी चार कंपन्यांचा संशयित म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

अहवालात नावे असलेल्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. सीबीआयच्या चौकशीत एखाद्या दलाच्या माजी प्रमुखाची नाव येण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी बराक क्षेपणास्त्रे खरेदी घोटाळ्यात नौदलाचे माजी प्रमुख सुशीलकुमार यांचे नाव सन २००५-०६ मध्ये पुढे आले होते.