हैदराबाद स्फोटप्रकरणी सुमारे ४० जणांची चौकशी

हैदराबाद/नवी दिल्ली: हाती आलेल्या माहितीचा वापर करून हैदराबादमध्ये झालेल्या दुहेरी स्फोट प्रकरणाची उकल करण्यासाठी तपास यंत्रणा जंग जंग पछाडत आहेत. स्फोटांमागे असणार्‍यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने तपास यंत्रणांनी आतापर्यंत सुमारे ४० जणांची चौकशी केल्याचे समजते.

दि. २१ फेब्रुवारी रोजी हैदराबादच्या दिलसुखनगरमध्ये झालेल्या स्फोटांत १६ जण मृत्युमुखी पडले; तर ११७ जण जखमी झाले. याप्रकरणी काही धागेदोरे आणि पुरावे हाती आल्याचा दावा तपास यंत्रणांकडून करण्यात येत आहे. त्याआधारे स्फोट घडवणार्‍यांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून आंध्र प्रदेश पोलीस, राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि इतर केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या पथकांनी काही जणांची चौकशी केली. या चौकशीतून नेमके काय निष्पन्न झाले ते सांगण्याचे तपास यंत्रणांबरोबरच सरकारी स्तरावरून टाळण्यात आले आहे.

तपास चालू असल्यामुळे या टप्प्यावर काही सांगणे योग्य ठरणार नाही. मात्र स्फोटांमागे असणार्‍यांना पकडले जाईल आणि कठोर शिक्षाही ठोठावली जाईल; असा विश्‍वास केंद्रीय गृहराज्यमंत्री आर. पी. एन. सिंह यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. तपास यंत्रणांनी गोळा केलेले पुरावे न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत; अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

दरम्यान; स्फोट झाले त्यादिवशी दिलसुखनगरमधील लॉज सोडून गेलेल्या तिघांभोवती संशयाचे धुके निर्माण झाले आहे. स्फोट घडलेल्या दिवशी संबंधित लॉज सोडून पाच जण निघून गेल्याचे वृत्त आहे. त्यातील दोघे निष्पाप असल्याचे त्यांच्या चौकशीतून स्पष्ट झाले. इतर तिघांविषयी मात्र नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. त्यांची ओळख पटवून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत. हे तिघे स्फोटांपूर्वी किंवा स्फोटांनंतर लगेचच लॉज सोडून गेल्याचा अंदाज आहे.

दुहेरी स्फोट झाले त्या भागात असणार्‍या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या फूटेजमधून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागतील; असा विश्‍वास तपास यंत्रणांना वाटत आहे. मात्र या फूटेजमध्ये स्पष्टता नाही. त्यामुळे या फूटेजची क्वालिटी सुधारावी यासाठी ते मुंबईतील फिल्म लॅबमध्ये पाठवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या फूटेजमध्ये तिघे सायकलीभोवती संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे दिसते. त्यामुळे हे फूटेज गांभीर्याने घेण्यात येत आहे. सायकलींना स्फोटके बांधून त्यांचे स्फोट घडवण्यात आल्याच्या संशयाची पार्श्‍वभूमी त्याला आहे.

दरम्यान, चित्रणाचा दर्जा सुधारण्यासाठी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) या अमेरिकी तपास संस्थेची मदत घेतली जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

दुहेरी स्फोटप्रकरणी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक (एटीएस) पुणे स्फोट प्रकरणातील दोन आरोपींची चौकशी करणार आहे. याबाबतची परवानगी आज येथील विशेष मोक्का न्यायालयाने एटीएसला दिली. फिरोज सय्यद आणि इरफान लांडगे यांची हैदराबाद स्फोटप्रकरणी चौकशी करण्याची परवानगी एटीएसने मागितली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यांची चौकशी करण्याची परवानगी दिल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांकडून देण्यात आली.