
नवी दिल्लीः देशातील सर्वांच्या गळ्यातील ताईत असलेल्या इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपण आजवर फोटो, व्हिडिओ आणि मसेजेस पाठवत होतो. पण व्हॉट्सअॅपने आता लाँच केलेल्या युपीआय पेमेंट सुविधेमुळे पैसे ट्रान्सफर करणे लवकरच शक्य होणार आहे. भारतात युपीआय आधारीत पेमेंट सेवा सुरु करण्याची व्हॉट्सअॅपला परवानगी देण्यात आली आहे. व्हॉटसअॅपचे भारतातील वापरकर्ते पाहता भारतात या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशातील डिजिटल व्यवहाराला चालना देण्यास व्हॉटसअॅप फायदेशीर ठरणार असून ही सेवा गुगल पे आणि पेटीएम तसेच इतर मोबाईल वॉलेटला तगडी टक्कर देणार असल्याचे बोलले जात आहे.
युपीआय आधारीत पेमेंट सेवा सुरु करण्याची WhatsAppला मिळाली परवानगी
यासंदर्भात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ( NPCL) दिलेल्या अहवालानुसार, भारतात युपीआय आधारीत सिस्टम सुरु करण्याची परवानगी व्हॉट्सअॅपला देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपने जुन महिन्यात पेमेंट सेवा सुरु केली होती. पण ही सेवा वापरण्याची संधी केवळ काही युजर्सला मिळाली होती. NPCLने आता देखील काही मोजक्या क्रमांकाना व्हॉट्सअॅप मनी ट्रान्सफरची सेवा वापरण्याची परवानगी दिली आहे. परंतू कंपनी ही मर्यादा आगामी काळात वाढवणार आहे.
NPCL ने दिलेल्या माहितीनुसार, गो लाईव्हची मंजुरी व्हॉट्सअॅप पेमेंट सुविधेसाठी देण्यात आली आहे. या मंजुरीच्या प्रतिक्षेत व्हॉट्सअॅप होते. कारण अगोदरच या सुविधेची चाचणी घेतली होती. त्यामुळे आता लवकरच व्हॉटसअॅप पेमेंटचा पर्याय उपलब्ध होणार आहे. व्हॉट्सअॅप युपीआयवर जास्तीत जास्त 20 दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्त्याचा आधार घेऊन आपला युपीआय युजर बेस वाढवू शकतो, अशी माहिती NPCL ने दिली आहे. परंतु अद्याप व्हॉट्सअॅपकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.
