ब्लॅकबेरी झेड १० ची जपानमध्ये विक्री नाही

ब्लॅकबेरीने जगभर विक्रीसाठी आणलेल्या त्यांच्या नव्या झेड १० आणि क्यू १० या स्मार्टफोनची विक्री जपानच्या बाजारपेठेत न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.. जपानमध्ये कंपनीचा मार्केट शेअर ५ टक्क्यांवरून ०.३ टक्कयांवर घसरला आहे आणि हे सारे मार्केट अॅपलच्या स्मार्टफोनने काबीज केले आहे असे सर्वेक्षणात कंपनीच्या नजरेस आले आहे. त्यामुळे जपानी भाषेतील व्हर्जन विकसित करणे कंपनीला मोठ्याच खर्चाचे आहे असे अंतर्गत सूत्रांकडून समजते.

वास्तविक दशकापूर्वी ब्लॅकबेरीनेच मोबाईल युजर संस्कृती जपानमध्ये रूजविली होती. मात्र कंपनीचे बरेच ग्राहक या काळात अॅपल आणि अँड्राईड बेस्ड स्मार्टफोनकडे आकर्षिले गेले आहेत. ब्लॅकबेरीच्या झेड १० आणि क्यू १० या स्मार्टफोनने जागतिक बाजारपेठ नजरेसमोर ठेवली होती. मात्र कंपनीच्या प्रवक्त्या अॅमी मॅकडोवेल यांनी मात्र जगातील कळीच्या बाजारपेठा हे आमचे लक्ष्य असल्याचे आणि जपानची बाजारपेठ आमच्यासाठी फारच छोटी असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. अर्थात ब्लॅकबेरीच्या जपानमधील ग्राहकांना पूर्ववतच सेवा दिली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.