ब्रिटीश सोव्हरिन गोल्ड कॉईनचे उत्पादन भारतात

नवी दिल्ली दि.२४- शंभर वर्षांच्या कालावधीनंतर म्हणजे १९१८ नंतर प्रथमच भारतात ब्रिटनच्या रॉयल मिटमध्ये तयार होणार्याभ सोव्हरिन गोल्ड कॉईनचे उत्पादन केले जाणार आहे. १९१८ सालात भारतात रॉयल मिंटची एक शाखा कार्यरत होती आणि त्यावेळी एका वर्षात १३ लाख अशी नाणी तयार करण्यात आली होती. मात्र त्यानंतर भारतीयांना ही शुद्ध सोन्याची नाणी खरेदी करणे अशक्य बनले होते.

भारतात होणारे या नाण्यांचे उत्पादन भारतीय उत्पादकच करणार असून त्यासाठी लागणारी उपकरणे आणि तंत्रज्ञान मात्र साऊथ वेल्स भागातील रॉयल मिंटकडूनच घेतले जाणार आहे. सुरवातीला अशी ५० हजार नाणी तयार केली जाणार आहेत. ही नाणी त्वरीत बाजारात विक्रीसाठी आणली जातील असे सांगितले जात आहे.

जगात सर्वात मोठा सोने खरेदीदार अशी भारताची ओळख आहे. सण समारंभ, लग्नकार्ये अशा कारणांसाठी सोन्याच्या शुद्ध नाण्यांना वर्षभरच भारतात मागणी असते. भारताचे सोन्याच्या नाण्यांचे मार्केट वर्षाला ८० टनांचे आहे असे थॉमस रॉयटर कन्सल्टन्सी फर्मने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment