नवी दिल्ली दि.२३ – संसदेवरील हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा कुप्रसिद्ध अतिरेकी अफझल गुरू याला ९ फेब्रुवारीला फाशी दिल्यानंतर दोन आठवड्यांचा कालावधी लोटला आहे मात्र त्याच्या कुटुंबियांकडून त्याच्या दफन स्थळाला भेट देण्याविषयीची कोणतीही विनंती करण्यात आलेली नाही असे तिहार जेलच्या महासंचालक विमला मेहरा यांनी स्पष्ट केले. फाशीनंतर त्याच्या दफन स्थळाला भेट देण्याची ऑफर केंद्र सरकारने अफझलच्या कुटुंबियांना दिली होती मात्र अफझलचा मृतदेह परत करावा अशी त्यांची मागणी होती व त्यामुळे त्यांनी ही ऑफर नाकारली होती असेही समजते.
अफझलला फाशी दिली जाणार असल्याचे पत्रही त्याच्या कुटुंबाला फाशी दिल्यानंतर दोन दिवसांनी मिळाल्याचे सांगितले जात आहे. यावर बोलताना मेहरा म्हणाल्या की आमच्यावर त्याला फाशी देण्याची जबाबदारी सोपविली गेली होती आणि आम्ही ती पार पाडली आहे. त्याचे दफन तिहार तुरूंगातच करण्यात आले आहे. त्याच्या कुटुंबियांनी विनंती केल्यास त्यांना या ठिकाणाला भेट देता येईल.
दरम्यान फाशीपूर्वी अफझलने आपल्या कुटुंबाला लिहिलेल्या पत्रात त्याच्या मृत्यूचा शोक करू नये तर त्याने बजावलेली कामगिरी लक्षात घेऊन त्याच्या बलीदानाचा अभिमान बाळगावा असे लिहिले होते असेही सांगण्यात येत आहे.